18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeलातूरआ. धिरज देशमुख यांच्या आमदार निधीतून रुग्णालयाला २० लाखांचे अद्ययावत साहित्य

आ. धिरज देशमुख यांच्या आमदार निधीतून रुग्णालयाला २० लाखांचे अद्ययावत साहित्य

एकमत ऑनलाईन

लातूर : रुग्णांना आपल्याच भागात योग्य उपचार मिळावेत, यासाठी लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयाला आपल्या स्थानिक विकास निधीतून सुमारे २० लाख रुपयांची अद्ययावत वैद्यकीय उपकरणे दिली त्यामुळे मुरुड ग्रामीण रुग्णालय आता अधिक सुसज्ज झाले आहे. या अद्ययावत वैद्यकीय साहित्याचे व ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते झाले.

रुग्ण आणि नातेवाईक यांची उपचारासाठी होणारी धावपळ टळावी, म्हणून आमदार धिरज देशमुख यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून दीड कोटी रुपये देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार लातूर ग्रामीण मतदारसंघातील वेगवेगळ्या रुग्णालयात अद्ययावत वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. यापैकी मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयाला आमदार धिरज देशमुख यांच्या स्थानिक विकास निधीतून दिलेल्या १० मल्टीपॅरा मॉनिटर, ०५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ०२ सिलिंडर ट्रॉली, ०२ ईसीजी मशीन, ०४ संगणक, ०४ प्रिंटर, ०१ पोर्टेबल एक्स-रे मशीन, ०३ बायपॅप मशीन या वैद्यकीय साहित्याचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जि. प. सदस्य दिलीप नाडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक लक्ष्मण देशमुख, सर्जेराव मोरे, रविंद्र काळे, सुभाष काळे, मदन काळे, रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक सुनीता पाटील, सरपंच अभयसिंह नाडे, उपसरपंच आकाश कणसे, डॉ. दिनेश नवगिरे, प्रवीण पाटील, डॉ. ईश्वरप्रसाद चांडक, माधव शिंदे, ज्ञानेश्वर भिसे, जयश्री तवले आदी उपस्थित होते.

आमदार धिरज देशमुख म्हणाले की, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा असतात, त्याच सुविधा ग्रामीण भागात असाव्यात, म्हणून स्थानिक विकास निधीतून त्या आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत. आता उपचारासाठी ग्रामस्थांना जिल्ह्यांच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीला मंजुरी आणून ते लवकर कार्यान्वित करण्याबाबत मी प्रयत्नशील आहे, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.

सक्षम आरोग्य यंत्रणा हे विकासाचे द्योतक
कोरोना महामारीमुळे रस्ते, नाली, पाणी, वीज या विकासकामांपेक्षा जनतेच्या आरोग्याच्या काळजीपोटी महाविकास आघाडी सरकारने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर सर्वाधिक भर दिला. आरोग्य सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य दिले. आरोग्य यंत्रणा सक्षम करणे हे विकासाचे द्योतकच आहे. कोरोना काळात आरोग्य क्षेत्रात सुविधा निर्माण करण्याबाबत राज्यात झालेले कार्य अतिशय मोठे आहे, असे आमदार धिरज देशमुख यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या