39.1 C
Latur
Wednesday, June 7, 2023
Homeलातूरभारतीय लोकशाहीचा लौकिक कायम राखण्यासाठी काँग्रेस पक्ष लढणार : आमदार अमित देशमुख

भारतीय लोकशाहीचा लौकिक कायम राखण्यासाठी काँग्रेस पक्ष लढणार : आमदार अमित देशमुख

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी देशात सध्या सत्ताधारी पक्षाकडून लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे. जगभरातून या संदर्भाने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशावेळी देशाचा लौकिक कायम राखण्यासाठी काँग्रेस पक्ष जनतेच्या न्यायालयात लढा उभारणार असल्याचे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आवाज दडपण्यासाठी केंद्र सरकारकडून होत असलेल्या कारवाईचा निषेध करून देशात निर्माण झालेल्या अराजकतेची माहिती देण्यासाठी शुक्रवार, दि. ३१ मार्च रोजी दुपारी लातूर शहरातील काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री आमदार अमित देशमुख बोलत होते. या पत्रकार परिषदेस पक्ष प्रतिनिधी आमदार राजेश राठोड, जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव यांच्यासह पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार अमित देशमुख पुढे म्हणाले की, देशात बेरोजगारी, महागाई यासारखे गंभीर प्रश्न निर्माण झालेले असताना ते सोडविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. मात्र जनतेचा आवाज बनून प्रश्न विचारणा-या खा. राहुलजी गांधी यांच्यावर अत्यंत गतिमान पद्धतीने कारवाई करण्यात येत आहे. त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. या परिस्थितीत काँग्रेस पक्ष केंद्रातील अत्याचारी, जुलमी सत्तेला घाबरणार नाही. लोकशाही मूल्य जोपासणा-या इतर सर्व राजकीय पक्ष व जनतेला सोबत घेऊन लोकशाही, संविधान व देश वाचवण्यासाठी लढाई लढून ती जिंकेल, असा विश्वास आमदार अमित देशमुख यांनी या वेळी व्यक्त केला.

अदानी-मोदी संबंधाच्या आरोपामुळेच राहुल गांधींवर कारवाई
या प्रसंगी आमदार राजेश राठोड म्हणाले की, ७ फेब्रुवारी रोजी लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी घोटाळ्यासंदर्भात प्रश्न विचारले. अदानी उद्योग समूहातील सेल कंपन्यात गुंतवलेले २० हजार कोटी कोणाचे आहेत? यात चिनी नागरिकांचा सहभाग आहे का? गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा संबंध काय आहे. परदेश दौ-यात पंतप्रधानांसोबत गौतम अदानी कोणत्या अधिकारात गेले, हे प्रश्न सरकारला हादरवून सोडणारे होते. या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागू नये, म्हणून खासदार राहुल गांधी यांनाच संसदेतून बडतर्फ करण्याची खेळी केंद्र सरकारने केली. राहुल गांधी यांचे हे प्रश्न देशातील जनतेचे प्रश्न आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष आता जनतेला सोबत घेऊन सरकारला हे प्रश्न विचारणार असल्याचे आमदार राठोड यांनी म्हटले.

सत्ताधा-यांनीच संसदेचे कामकाज चालू दिले नाही
काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागू नयेत, म्हणून या अधिवेशनात शासनाच्या सत्ताधारी मंडळींनीच संसदेचे काम चालू दिले नसल्याचे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी या वेळी सांगितले. विरोधी पक्षांनी जेपीसीची मागणी करताच अदानीला वाचवण्यासाठी संसदेचे काम बंद पाडण्यात येत होते, हेही त्यांनी निर्दशनास आणून दिले. शेवटी खासदार राहुल गांधी यांना बडतर्फ करून सरकारला वाचवण्याचे काम सत्ताधा-यांनी केले आहे. खासदार राहुल गांधी यांनी संसदेत विचारलेले प्रश्न आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन सरकारला विचारू, असेही उटगे यांनी सांगितले.

भाजपकडूनच ओबीसीचा अवमान
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला, असा भाजपकडून धादांत खोटा आरोप केला जात आहे. निरव मोदी, ललीत मोदी हे ओबीसी समाजाचे नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचा भ्रष्टाचारी लोकांशी संबंध जोडून भाजपच ओबीसी समाजाचा अपमान करीत आहे, ही बाब आम्ही जनतेला पटवून देणार असल्याचे लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

या प्रसंगी लातूर शहर मीडिया काँग्रेस सेलचे अध्यक्ष व्यंकटेश पुरी, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष समद पटेल, गोरोबा लोखंडे, अ‍ॅड. फारुक शेख, इमरान सय्यद, सिकंदर पटेल, दीपक राठोड, दगडूआप्पा मिटकरी, देवीदास बोरुळे पाटील, अविनाश बट्टेवार, विष्णुदास धायगुडे, अभिषेक पतंगे, अकबर माडजे आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, पत्रकार बांधव उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन लातूर जिल्हा काँग्रेस सोशल मीडियाचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी यांनी केले तर शेवटी आभार लातूर शहर मीडिया काँग्रेस सेलचे अध्यक्ष व्यंकटेश पुरी यांनी मानले.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या