निलंगा : निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे लातूर ते जहिराबाद मार्गावर दि. ३० मे २०२२ रोजी रोडच्या बाजूला नालीत अनोळखी पुरुषाचे प्रेत आढळून आले होते. याबाबत निलंगा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी एक व्यक्ती व एका महिलेस ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर व्यक्तीचा खून केल्याची कबुली दिली.
निलंगा पोलस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांनी पथकासह घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली व मयताचे फोटो काढून शोध पत्रिका तयार करण्यात आली. सदर वर्णनाच्या इसमाबाबत मिसिंग दाखल असल्याबाबत इतर पोलिस ठाण्याकडून माहिती घेण्यात आली परंतु उपयुक्त माहिती मिळून येत नव्हती. मृतदेहाचे शवविच्छेदन केले. सदरचे प्रेत हे कुजलेल्या अवस्थेत असल्याने ग्राम प्रशासनाच्या मार्फत पानचिंचोली येथे दफन विधी करण्यात आला. त्यानंतर निलंगा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांच्या नेतृत्वात निलंगा पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आले.
तपासादरम्यान मयत व्यक्तीच्या वर्णनाचा इसम पंढरपूर येथून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्यावरून मयताचे नाव भानुदास जगन्नाथ माळी (६०, रा. सुपली, ता. पंढरपूर जि. सोलापूर) असे असल्याबाबत माहिती मिळाली. अधिक माहिती घेतली असता मयत भानुदास जगन्नाथ माळी एका महिला व पुरुषाच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून निलंगा तालुक्यातील इनामवाडी येथे जाऊन संशयित अमरनाथ अशोकराव किने, वय २१ वर्ष, रा.. इनामवाडी यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पंढरपूर येथील एका महिलेच्या सहाय्याने भानुदास माळी यास पंढरपूर येथून सोबत घेऊन पानचिंचोली रोडवर गाडीत गळा आवळून खून केल्याचे सांगितले. या माहितीवरून पोलिसाच्या तपास पथकाने सदर महिलेला ताब्यात घेऊन चौकशी कामी निलंगा येथे आणले. चौकशीदरम्यान तिने तिचा मित्र अमरनाथ किने याच्या सहाय्याने भानुदास माळी याच्यासोबत असलेल्या पैशाच्या व्यवहारावरुन व त्याच्यासोबत असलेल्या अनैतिक संबंधावरुन खून केल्याचे सांगितले. या प्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ हे करीत आहेत.