लातूर : प्रतिनिधी
तालुक्यातील बाभळगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात १६ मे रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत सत्र क्रमांक १७ मधील पोलीस प्रशिक्षणार्थीचा दीक्षांत संचलनाचा दिमाखदार सोहळा पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांची उपस्थिती होती.
५ जुलै २०२१ ते १६ मे २०२२ या कालावधीत पोलीस प्रशिक्षण कंद्रात एकुण ३१० प्रशिक्षणार्थींनी मुलभूत प्रशिक्षण पूर्ण केले. या सत्रात मुंबई शहरास विविध १७ जिल्हे व ५ आयुक्तालये यातील नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पुर्ण केले आहे. या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी यांनी दिमाखदार परेड संचलन केले. संचलनात परेड कमांडर म्हणून सौरभ मातेरे यांनी नेतृत्व केले. यावेळी सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षणार्थींचा सन्मान ओमकार चंद्रकांत पाटील भरती जिल्हा रत्नागिरी या प्रशिक्षणार्थीने पटकावला. विशेष प्राविण्य मिळविलेले प्रशिक्षणार्थी अश्वजीत दीपक, स्टीफन बस्त्याव पिंटो, संकेत चौधरी, सौरभ मातेरे, अंकुश जायभाये यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. संचलनानंतर प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य वैभव कलुबर्मे यांनी प्रशिक्षणार्थींना कर्तव्याची शपथ दिली. तसेच प्रशिक्षण केंद्राच्या कामाचा अहवाल सादर केला.
कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, सीमा सुरक्षा बलाचे सेकंड इन कमांडंट उत्तम कांबळे, केंद्रीय राखीव पोलीस बलाचे सेकंड इन कमांडंट रनबिर सिंग, उपविभागीय पोलीस
अधिकारी जितेंद्र जगदाळे, लातूर ग्रामीणचे सुनील गोसावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोषकुमार डोपे, डॉ. सारडा यांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन अब्दुल गालिब शेख व पोलीस निरीक्षक बबिता वाडकर यांनी केले. उपप्राचार्य सुधीर खिरडकर यांनी आभार मानले.