लातूर : नविन एम.आय.डी.सी. बार्शी रोड १२ नंबर पाटी येथील एक हजार मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह येथील कोविड सेंटरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णांनी दि. २५ जुलै रोजी भूलई खेळ खेळत नागपंचमीचा सण आनंदात साजरा करुन सुख:द धक्का दिला आहे.
नागपंचमीच्या सणानिमित्त या कोविड सेंटरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह सेंटरला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी भेट देऊन पाहणी करुन कोरोना रुग्णांची अस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच एका वृद्ध महिला रुग्णांची स्व:त पल्सरेटची तपासणी केली व रुग्णाच्या मनातील भिती घालविण्यासाठी समुपदेशन केले तसेच संबंधीत कोरोना सेंटरमध्ये कोरोना बाधितांच्या मनोरंजनासाठी ताबडतोब व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.
या वेळी (२५ जुलै ) येथील कोविड सेंटर मधून २८ कोविड रुग्ण बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील सर्व रुग्णांशी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी संवाद साधून येथील व्यवस्थे बाबतची माहिती जाणून घेतली. तसेच येथील रुग्णांनी जेवणात सकस आहार मिळत असल्या बाबत समाधान व्यक्त करुन कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांनी आपला प्लाझमा दान करण्याची इच्छा व्यक्त केली.
या कोविड सेंटर भेट दरम्यान उपजिल्हाधिकारी तथा इन्चार्ज ऑफिसर विजय ढगे यांनी कोविड सेंटरमधील सर्व नोंदीची माहिती जिल्हाधिकारी यांना सविस्तरपणे विषद केली. यावेळी तहसीलदार स्वप्नील पवार, गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, जिल्हा परिषदेचे कॅफो रत्नराज जवळगेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव शिंदे, डॉ. देशमुख, नायब तहसीलदार तथा कोविड केअर सेंटरचे नोडल अधिकारी राजेश जाधव उपस्थित होते.