25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यातील ६ लाख ७२ हजार नागरिकांची कोरोना चाचणी

लातूर जिल्ह्यातील ६ लाख ७२ हजार नागरिकांची कोरोना चाचणी

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला तेव्हापासून आजपर्यंत जिल्ह्यातील एकुण ६ लाख ७२ हजार ६०१ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात २ लाख ५० हजार १६६ आरटीपीसीआर तर ४ लाख २२ हजार ४३५ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश आहे. या ६ लाख ७२ हजार ६०१ चाचण्यांमधून ९१ हजार ३३१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

जगातच नव्हे तर आपल्या देशात आणि महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तेव्हा प्रारंभीची काही महिने लातूर जिल्हा कोरोनामुक्त होता. उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाणा-या यात्रेकरुंनी प्रवासादरम्यान निलंगा येथे मुक्काम केला आणि कोरोनाचा लातूर जिल्ह्यात शिरकाव झाला. तेव्हा पासून अतिश्यक कमी प्रमाणात कोरोनाची रुग्णसंख्या होती. हळूहळू ही रुग्णसंख्या वाढत गेली आणि लातूर जिल्ह्यातही दररोज किमान ८० ते ९० कोरोनाबाधित रुग्ण आढळून यायला लागले.

लातूर शहराच्या बाबतीतही असेच घडले. सुरुवातीची काही महिने महानगरपालिकेच्या क्षेत्रात लातूर महानगरपालिका क्षेत्रही कोरोनामुक्त होता. परंतू, कर्नाटकातून एक व्यक्ती उपचारासाठी लातूर शहरातील पाहूण्यांच्या घरी थांबला आणि लातूर शहरालाही कोरोनाची लागण झाली. तेव्हा पासून आजपर्यंत लातूर शहरातीलही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत गेली. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापण विभाग, आरोग्य विभाग हे सर्वच विभाग सर्व शक्तीनिशी कामाला लागले. दिवसरात्र एक करुन कोरोना प्रतिबंधात्मक कामाला सुरुवात झाली.

कोरोनाची पहिली लाट लातूर जिल्ह्यासाठी तशी अगदीच नवीन होती. त्यामुळे या काळात जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानूसारच कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले गेले. गर्दी टाळावी, हात सतत धुवावेत, चेह-यावर मास्क लावावा, फिजिकल डिस्टन्स पाळावा, आदी सुचना जिल्हा प्रशासनाने केल्या. त्यावर नागरिकांनी ब-यापैकी अंमलबजावणी केली. मात्र हे सर्व करुनही लातूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढतच गेली त्यामुळे जिल्हा प्रशासनाला लॉकडाऊन करावे लागते. त्यामुळे सर्वच थांबले. व्यापार, उद्योग, व्यवसाय सर्व गोष्ठी ठप्प झाल्या. आर्थिक चक्र रुतले. कोरोनाच्या पहिल्या लाटेतून कसेबसे बाहेर पडतो न पडतो तोच कोरोनाची दुसरी लाट आली.

कोरोनाची दुसरी लाट लातूर जिल्ह्यासाठी अत्यंंत कठीण ठरली. या लाटेत रुग्णसंख्या हजारोंवर गेली. त्यामुळे कोविड केअर सेंटर्स वाढवावे लागले. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड्स वाढवावे लागले. या काळात ऑक्सिजन बेड मिळवणे म्हणजे दिव्य कार्यच होते. सर्व आरोग्य यंत्रणा झाडू कामाला लागली. विविध उपाययोजना कराव्या लागल्या. चाचण्या वाढवाव्या लागल्या. सर्व त-हेच्या प्रयत्नामुळे कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत आहे.

लातूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला तेव्हापासून आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ५० हजार १६६ आरटीपीसीआर तर ४ लाख २२ हजार ४३५ रॅपिड अँटिजेन चाचण्या असे एकुण ६ लाख ७२ हजार ६०१ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ९१ हजार ३३१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ हजार ४१० जणांचा उपचारादरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. आजघडीला १६२ रुग्ण उपचार घेत आहेत. ८८ हजार ७५९ कोरोनाबाधित रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी परत गेले आहेत. सध्या लातूर जिल्ह्यात ८ हजार ८ बेड असून त्यापैकी ५ हजार ६७९ बेड्स शिल्लक आहेत.

जिल्ह्यातील ११० कोरोना सेंंटर कोरोनामुक्त
कोरोनाच्या दुस-या लाटेत लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत होती. या रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणा कमी पडत होती. हे लक्षात घेऊन जिल्ह्यात सुमोर १३० ठिकाणी कोविड केअर सेंटर्सची स्थापना करुन कोरोनाबाधित रुग्ण भरती करुन त्यांच्या वर यशस्वी उपचार केले गेले. आज जिल्ह्यातील ११० कोविड केअर सेंटरमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण भरती नाही. त्यामुळे हे ११० कोविड केअर सेंटर कोरोनामुक्त झाले आहेत. आजघडीला जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटरमध्ये १६२ जण उपचार घेत आहेत.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या