22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeलातूरसहा लाख लोकांची कोरोना चाचणी

सहा लाख लोकांची कोरोना चाचणी

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोनाच्या पहिल्या व दुस-या लाटेपासून आजपर्यंत लातूर जिल्ह्यात गेल्या १४ महिन्यांत २ लाख २० हजार ३०५ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३५ हजार ५७२ जण पॉझिटिव्ह आले तर ३ लाख ७४ हजार ४२ रॅपिड अ‍ॅटिजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यात ५४ हजार ६४० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यात एकुण ५ लाख ९४ हजार ३४७ चाचण्या करण्यात आल्या त्यात ९० हजार १९६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

१४ महिन्यांपुर्वी जेव्हा आपल्या देशात, महाराष्ट्रात कोरोनाचा शिकाव झाला तेव्हा काही महिने लातूर जिल्हा कोरोनामुक्त होता. जिल्हा कोरोनामुक्त राहावा, यासाठी सर्व यंत्रणा पुर्णक्षमतेने कार्यरत होत्या परंतू, या न त्या कारणाने कोरोनाने लातूर जिल्ह्यात शिरकाव केला. उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाणारे काही प्रवासी निलंगा येथे थांबले आणि कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. पाहता पाहता कोरोनाने संपूर्ण जिल्ह्यात धुमाकुळ घालण्यास सुरुवात केली. गेल्या १४ महिन्यांत कोरोनामुळे लातूर जिल्ह्यात अनेक घडामोडी घडल्या. जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य विभागाने संपूर्ण यंत्रणा कामाला लावली.

आरोग्य सेवा देणारी मोठी यंत्रणा उभी राहिली. केंद्र, राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालण करण्यावर भर देण्यात आला. प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान महाविद्यालयासंह अनेक ठिकाणी कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड हॉस्पिटलस् सुरु करण्यात आले. खाजगी हॉस्पिटलमध्येही कोरोनावर उपचाराची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना चांगल्या सेवा-सुविधा मिळाल्या. कोरोना महामारीच्या काळात अनेक कोरोनाबाधित नागरिक उपचाराने सुखरुपपणे कोरोनामुक्त झाले.

लातूर जिल्ह्यात आजपर्यंत ९० हजार २१२ नागरिकांना कोेरोना विषाणूची बाधा झाली. त्यापैकी ८७ हजार ५२६ रुग्ण उपचराने बरे होऊन घरी गेले आहेत. आजघडीला २९४ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत व्हेंटिलेटरवर ३, बायपॅप व्हेंटिलेटरवर १२ रुग्ण उपचार घेत आहेत. या संस्थेत १९ व्हेंटिलेटर तर ३३ बायपॅप व्हेंटिलेटर शिल्लक आहेत. उदगीरच्या सामान्य रुग्णालयात २० व्हेंटिलेटर, ५ बायपॅप, निलंगा उपजिल्हा रुग्णालयात ८ व्हेंटिलेटर, २ बायपॅप, एमआयएमएसआर मेडिकल कॉलेज लातूर ४ व्हेंटेलेटर, ६ बायपॅप शिल्लक आहेत. उपरोक्त चार ठिकाणी एकुण ५४ व्हेंटिलेटर तर ५८ बायपॅप शिल्लक आहेत. दुर्दैवाने २ हजार ३८८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात कोरेनासह मधुमेह, रक्तदाब, -हदयरोग आदी आजाराचे ८५३, इतर आजार नसलेले १५३५ जणांचा समावेश आहे. मृतांमध्ये ७० वर्षे वयाच्या पुढील ८०९, ६० वर्षांवरील ७१२, ५० वर्षांवरील ४३१ तर ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या ४३६ जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यात ५५९७ बेड शिल्लक
कोरोनाच्या पहिल्या व दुस-या लाटेने लातूर जिल्ह्यात हाहाकार माजवला होता. दररोज हजाराच्यावर लोक कोरोनाबाधित होत असे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात १२७ विविध संस्थांमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करुन ८ हजार ८ बेडची व्यवस्था केली होती. आजघडीला कोरोनाची संख्या घटल्याने ५ हजार ५९७ बेड शिल्लक आहेत.

६९ कोविड सेंटरमध्ये रुग्णच नाहीत
एकवेळ अशी होती की जिल्ह्यातील १२७ कोरोना केअर सेंटरमध्ये साधा बेडसुद्धा मिळत नव्हता. ऑक्सिजनबेड मिळणे तर खुपच अवघड झाले होते. आजघडीला कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ६९ कोविड सेंटरमध्ये आजघडीला रुग्णच नाहीत.

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या