जळकोट : संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घालणा-या कोरोनावर पुण्यातील सिरम इन्स्टीट्यूटमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस निर्माण करण्यात आली, यामुळे ही एक जनतेसाठी दिलासादायक बातमी होती, असे असले तरी फ्रन्टलाईनवर काम करणा-या अधिकारी तसेच कर्मचा-यांना सुरुवातीस कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.जळकोट तालुक्यात फेब्रुवारी अखेरपर्यंत तब्बल सहाशे आठ जणांना ही लस देण्यात आली आहे, तर ८० जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय पवार यांनी दिली.
कोरोनामुळे तीन ते चार महिने भारतामध्ये लॉकडाऊन होते. त्यानंतर या महामारीवर औषध शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली परंतु हे औषध शोधण्यास अनंत अडचणी आल्या, शेवटी पुण्यातील सिरम इन्स्टीट्यूट मध्ये कोवीशील्ड नावाची लस तयार करण्यात यश आले.
सुरुवातीला जळकोट तालुक्यातील शासकीय डॉक्टर तसेच खाजगी डॉक्टरांना ही लस टोचण्यात आली, यानंतर महसूल विभागाचे अधिकारी तसेच कर्मचा-यांना लस टोचण्यात आली, यानंतर पंचायत विभागातील अधिकारी तसेच ग्रामसेवकांना ही लस देण्यात आली, तर आता खाजगी व शासकीय शाळेतील शिक्षकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचली जात आहे . फेब्रुवारी अखेरपर्यंत जळकोट तालुक्यातील सहाशे आठ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे तर ८० जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
खाजगी रुग्णालयातही लस उपलब्ध
सध्या जी कोरोना लस दिली जात आहे ती शासकीय दवाखान्यात दिली जात आहे आणि फ्रटलाईनवर काम करणा-या अधिकारी तसेच कर्मचा-यांना ही लस मोफत दिली जात आहे, आता सरकारने ठरवून दिलेल्या खाजगी रुग्णालयात कोरोनाची लस उपलब्ध करून देण्यात आली आहे, या लसीचीकिंमत अडीचशे रुपये ठेवण्यात आली आहे.
इंटरनेट अभावी स्वस्तधान्य दुकानदाराची रानमाळात भटकंती