लातूर : मागील अनेक महिन्यांपासून ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आज आला. जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोनावरील लस उपलब्ध झाली आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभही झाला. लातूर शहर महापालिका कार्यक्षेत्रातील आरोग्य सेवकांना ७ हजार लस शासनाने उपलब्ध करून दिल्या असून त्याचे लसीकरण प्रत्यक्षात सुरू झाले. शतकातील ही सर्वात महत्त्वाची आणि संस्मरणीय घटना ठरावी.
लातूर शहर लसीकरण मोहिम अंतर्गत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत जिल्हास्तरीय कोविड १९ लसीकरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासन व महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ.गिरीश ठाकूर यांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली. पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्यासह राज्याचे पाणीपुरवठा व पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज, पालिका आयुक्त देविदास टेकाळे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. भारतबाई साळुंके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.मोहन डोईबोले, जिल्हा शल्य चिकित्सक लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.महेश पाटील,डॉ. प्रशांत माले, नोडल अधिकारी डॉ. एस.सी. मजगे, यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की,कोरोना लसीकरणासाठी कोवीन ॲपवर नोंदणी करण्याच्या सूचना शासनाने केलेल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील २१bहजार हेल्थ वर्कर्सची नोंद या ॲपवर करण्यात आलेली आहे. त्यात लातूर महापालिका क्षेत्रातील ७ हजार हेल्थ वर्कर्सचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यासाठी कोरोना लसचे २१ हजार डोस प्राप्त झालेले आहेत. महापालिका क्षेत्रातील हेल्थ वर्कर्ससाठीही डोस प्राप्त झालेले असून यामधून प्रत्येकाला लसीचा पहिला डोस दिला जात असल्याचे ते म्हणाले. शासनाच्या निर्देशानुसार लसीकरणाचा दुसरा टप्पा राबवला जाईल. त्यासंबंधी वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचनांनुसार लसीकरण केले जाणार असल्याचेही पालकमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान लस उपलब्ध झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला असून त्यांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत होणार आहे. लसीकरण मोहीम सक्षमपणे राबवण्याची तयारी महापालिकेने केलेली असून शासनाच्या निर्देशानुसार लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे अशी माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.
अफवांना बळी पडू नका दोन्हीही लसी सुरक्षित – पंतप्रधान नरेंद्र मोदी