लातूर : प्रतिनिधी
कोरोनाने पुन्हा एकदा लातूर जिल्ह्याला कवेत घ्यायला सुरुवात केली आहे. देशातही सध्या अशीच परिस्थिती आहे. देशभरात रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत. लातूर जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्याचा वेग वाढत आहे. गेल्या ४ दिवसांत लातूर जिल्ह्यात २१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाची पहिली लाट लातूर जिल्ह्यात तशी खुप उशिराने आली. संपुर्ण देश कोरोनाच्या विळख्यात होता त्यावेळी लातूर जिल्हा कोरोनामुक्त होता. उत्तर भारतातून दक्षीण भारतात जाणा-या यात्रेकरुंनी निलंगा येथे मुक्काम केला आणि लातूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. संपूर्ण जिल्हा कोरोनाच्या विळख्यात गेला मात्र लातूर शहर महानगरपालिकेची हद्द कोरोनामुक्त होती. कर्नाटकातील एक व्यक्ती डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी लातूरला आला आणि लातूर शहराला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर मात्र लातूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढले. आरोग्य यंत्रणेची धावपळ झाली. कोरोनाची पहिली लाट काही दिवसांतच संपूर्ण जिल्हाभर पसरली. ही लाट रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक व आरोग्य यंत्रणेला नवखी होती त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार आरोग्य यंत्रणेने उपचार सुरु ठेवले. पहिली लाट ओसली आणि काही दिवसांतच कोरोनाची दुसरी लाट आली. कोरोनाची दुसरी लाट भयंकर होती.
कोरोनाच्या दुस-या लाटेने आरोग्य यंत्रणा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक या सर्वांचीच परीक्षा घेतली. एकीकडे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत होती. आरोग्य यंत्रणेने उभी केलेली व्यवस्था तोकडी पडत होती. साधे बेड मिळणे अवघड झाले होते. तिथे ऑक्सिजन व व्हेंटीलेटर बेडसाठी तर रुग्णांच्या नातेवाईकांना दिवस-रात्र धावपळ करावी लागली. लातूर जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत २४८६ जणांचा मृत्यू झाला त्यातील सर्वाधिक मृत्यु हे दुस-या लाटेतीलच आहेत. तिसरी लाट पहिल्या दोन लाटेपेक्षा सौम्य होती. त्याला कारण लसीकरण होय.
आता चौथी लाट येऊन ठेपत आहे. मार्च २०२२ नंतर लातूर जिल्ह्यात पुन्हा कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढत आहे. दि. ८ जून रोजी जिल्ह्यात एकुण १८६ चाचण्या करण्यात आल्या त्यात ३, दि. ९ जूनच्या २७१ चाचण्यांत ३ तर दि. १० जून रोजीच्या २९१ चाचण्यांत ८, दि. ११ जून रोजीच्या ३२९ चाचण्यांत ७ असे ४ दिवसांत २१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ५ हजार ३४४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख २ हजार ८२८ रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी परत गेले आहेत. दुर्दैवाने उपचारादरम्यान २ हजार ४८६ रुग्णांचा मृत्यु झालेला आहे.