लातूर : प्रतिनिधी
कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाण १०० पूर्ण करण्यासाठी विशेषत: १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे व १५ ते १७ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांचे पहिल्या व दुस-या डोसचे लसीकरण, १८ ते ६० वर्षे वयोगटातील प्रलंबीत दुस-या डोसचे लसीकरण व ६० वर्षावरील पात्र नागरीकांचे प्रिकॉशन डोसचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी शासनामार्फत दि. १ जून ते ३१ जुलै या कालावधीत ‘हर घर दस्तक-२’ मोहीम राबविण्यात येणार आहे.
याअंतर्गत घरोघरी जावून ज्यांचे लसीकरण प्रलंबीत आहे त्यांचे कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी लातूर मनपामार्फत एएनएम व आशा स्वयंसेविका यांचा समावेश असलेली एकूण ४० पथके नियुक्त करण्यात आलेली असून त्यांचेमार्फत निश्चित वेळापत्रकानूसार घरोघरी जावून १२ वर्षापूढील ज्या नागरीकांचे वरीलप्रमाणे लसीकरण प्रलंबीत आहे त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणुच्या नवीन व्हॅरीएंटचे रुग्ण नुकतेच पुणे शहरामध्ये आढळून आले आहेत. त्यामूळे कोरोनाचा प्रादूर्भाव परत उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्या परिस्थितीत गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे व कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करुन घेणे हे आपल्या स्वत:च्या व कुटुंबातील इतर व्यक्तींच्या संरक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे. तरी कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणासाठी आपल्या घरी येणा-या लसीकरण पथकास सहकार्य करावे. व आपले प्रलंबीत लसीकरण त्वरीत पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.