लातूर : शहरात महानगरपालिकेचे ‘ए’, ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ असे चार झोन आहेत. या चार झोनपैकी ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ या तीन झोनमध्ये ८१ धोकादायक इमारती आहेत. ‘डी’ झोनमध्ये सर्वाधिक धोकादायक इमारती आहेत. मात्र या झोनच्या स्वच्छता निरीक्षकांकडून दरवर्षी या धोकादायक इमारत मालकांना इमारत दुरुस्त करा किंवा पाडून घ्या, इमारत ढासाळून जिवीत हानी झाली तर महापालिका त्यास जबाबदार राहणार नाही, अशा नोटीसा दिल्या जातात. नोटीसां दिल्या की, आपली जबाबदार संपली, असे कदाचित महापालिका प्रशासनाला वाटत असावे आणि अशा नोटीसा दरवर्षीच येतात.
नोटीसा पाठवणे त्यांचे कामच आहे, अशी भूमिका इमारत मालकांची असावी. त्यामुळे या विषयी कोणाचेही गांभीर्य दिसून येत नाही. सध्या तीन-चार दिवसांपासून संततधार भिजपाऊस पडत आहे. अशा पावसात धोकादायक इमारती ढासळण्याचा जास्त संभव असतो, असे असले तरी महापालिका प्रशासनाने नोटीसा पाठवण्यापलिकडे काहींच कारवाई केलेली नाही. महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.