लातूर : प्रतिनिधी
खतांची लिंकिंग, कृत्रिम टंचाई भासवून केली जात असलेली दरवाढ, बोगस बियाणे यावर रोख लावावा, अशी मागणी जिल्हाधिकारी लातुर यांच्याकडे करण्यात आली. सध्या रासायनिक खतांचे दर वाढल्याने शेतकरी अगोदरच परेशान आहेत. त्यात खताची कृत्रिम टंचाई भासवून जादा दराने खत विकण्याचे प्रकार सुरू आहेत. तसेच डीएपी अथवा इतर खत घ्यायचे असतील तर तुम्हाला सोबत लिंकिंगचा खत घ्यावा लागेल आम्हाला कंपनीकडूनच तशी लिंकिंग दिली जात असल्याने आमचा नाईलाज आहे. असे सांगून खत दुकानदार सर्रास लिंकिंग करताना दिसत आहेत. या सोबतच महाबीज व सोयाबीन बियाण्यांची कृत्रिम टंचाई दाखवून नंतर चढया भावात ते विकण्याचा दुकानदारांचा डाव दिसत आहे. तसेच मध्यप्रदेश, गुजरात व महाराष्ट्रातीलही अनेक कंपन्या त्याचे प्रमाणित नसलेले बोगस बियाणे दरवर्षी बाजारात आणून विकतात असे प्रकार यावर्षीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे कृषी विभागाने सजग राहून या सर्व प्रकारांवर आवर घालणे गरजेचे आहे. परंतु बहुधा आर्थिक देवाणघेवाणीमुळे काही कृषीतील अधिकारी आम्ही दुकानदारांना असे प्रकार करू नका असे आदेश दिले आहेत. आम्ही दुकानांच्या तपासण्या करत आहोत असे सांगताना व एखाद्या दुस-या दुकानांवर कार्यवाहीचे नाटक करून बाकी दुकानदारांना बोगस बियाण्याची विक्री, लिंकिंग, कृत्रिम टंचाई, चढयाभावाने विक्री करण्यासाठी मोकळे सोडतात, असे घडताना आम्ही पाहत आहोत. परंतु आम्ही शेतक-यांची होत असलेली लूट कसल्याही हालतीत सहन करणार नाहीत. यावर्षी जर असे चुकीचे प्रकार आम्हाला आढळून आले तर संबंधित अधिका-याच्या तोंडाला काळे लावायला आम्ही मागेपुढे पाहणार नाहीत. असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा मनसे शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे, डॉ नरसिंह भिकाने, शिवकुमार नागराळे, संजय राठोड, भागवत शिंदे यांच्या वतीने जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.