18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeलातूरमांजरा नदीकाठच्या साडेसात हजार एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

मांजरा नदीकाठच्या साडेसात हजार एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

एकमत ऑनलाईन

लातूर : मांजरा धरण १०० टक्के भरल्याने प्रशासनाने या धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु ठेवला आहे. याचा परिणाम म्हणून मांजरा नदीला पुर आला आहे. लातूर, निलंगा, शिरुर अनंतपाळ, देवणी तालुक्यातील मांजरा नदीकाठच्या शेतक-यांचे प्रचंड नूकसान झाले आहे. पाणी शेत, शिवारात शिरल्याने अक्षरश: सर्व पिके पाण्यामध्ये आहेत. पिकांचे शंभर टक्के नूकसान झाले आहे. मांजरा नदीकाठच्या सुमारे साडेसात हजार एकर क्षेत्रावरील पिकांचे नूकसान झाल्याचे अंदाज संबंधीत यंत्रणेने वर्तविला असून त्याची प्रत्यक्ष मोजदाद केली जात असल्याची माहिती संबंधीत विभागाने दिली.

गेल्या पाच-सहा दिवसांत पावसाने लातूर जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस पडल्याने मांजरा धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे मांजरा धरणाचे दरवाजे उघडावे लागले. त्यामुळे धरणापासून देवणी तालुक्यातील सिंधीकामठ गावापर्यंत १४३ किलो मीटरच्या नदीला पुर आला आहे. या पुरामुळे नदीकाठच्या सुमारे साडेसात हजार एकर क्षेत्रातील खरीप पिकांचे नूकसान झाले आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीनचा पेरा होता. त्यामुळे पिकांच्या नूकसानीत सर्वाधिक नुकसान सोयाबीन पिकाचेच झाले आहे. यासोबत तूर, मुग, उडीद, ज्वारी, साळ, बाजरी, भोईमुग, तीळ, मका, सूर्यफुल या पिकांसह ऊसाचे मोठे नूकसान झाले आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासुन पिके पाण्यात असल्यामुळे पिके सडू लागली आहेत. या पिकांच्या नूकसानीची माहिती घेतली जात असून एक-दोन दिवसांत नेमके किती हेक्टरवरील पिकांचे नूकसान झाले, याची माहिती मिळेल, असे संंबंधीत विभागाने सांगीतले.

लातूर जिल्ह्यातील पाच महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असून या भागातील नाले, ओढे भरुन वाहत आहेत. हरंगुळ, मुरुड, तांदूळजा, भादा, निलंगा यासह काही भागात अतिवृष्टी नोंदण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून दररोज जोरदार पाऊस पडत असल्याने शेतात कसल्याच प्रकारची कामे करता येत नसल्याने शेतकरी व शेतमजूरांच्या हाताला काम उरलेले नाही. सोयाबीनचे काढणीचे पीक पाण्यात जाण्याचीही भीती व्यक्त होत आहे. लातूर जिल्ह्यात अपेक्षीत सरासरीच्या १२०.२ टक्के तर वार्षिक सरासरीच्या ११४.१ टक्के एवढा पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मांजरा, निम्न तेरणा हे दोन मोठे, आठ मध्यम तर १२३ लघु असे एकुण १४२ प्रकल्प पाण्याने भरले आहेत.

विमा संरक्षीत पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीला कळवावे
जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासुन सर्वदुर पाऊस होत आहे. सध्या खरीप पिके शेतात उभी आहेत तसेच काही पिकाची काढणी सुरु आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास भूस्सखलन, गारपीट, ढगफूटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग यामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाते. विमा संरक्षीत पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपनीला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच काढणीपश्चात नुकसान या जोखीमेअंतर्गतदेखील वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाते. फळपिक विमा धारक शेतक-यांनादेखील वेगाचा वारा व गारपीट या बाबीकरीता वयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाते. यासाठी शेतक-यांनी ही घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत नुकसानीची सुचना सर्व प्रथम प्राधान्याने ोबाईल अ‍ॅपव्दारे देण्यात यावी.

जेणेकरुन शेतक-यांना व्यक्तीश अर्ज, कागदपत्रे दयावे लागणार नाहीत व कार्यालया समोरील संभाव्य गर्दी होणार नाही. ज्या शेतक-यांचे नुकसान झालेले आहे यांनी प्राधान्याने अ‍ॅपव्दारे नुकसानीची सूचना नोंदवावी व अधिक माहितीसाठी भारतीय कृषि विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी संतोष भोसले, मो. क्र. ९३७०९५००४४ व जिल्हा प्रतिनिधी एच.डी.एफ.सी. अर्गो जनरल इन्शुरंस कंपनीचे अविनाश खेडकर मो.न. ८८८८४३६०५४ यांच्याशी किंवा नजीकच्या कृषि विभागाशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या