22.6 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home लातूर पदवीधरांच्या भाजपा मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी

पदवीधरांच्या भाजपा मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी

एकमत ऑनलाईन

लातूर : मराठवाडा पदवीधर मतदार संघ भाजपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने दि. २४ नोव्हेंबर रोजी येथील औसा रोडवरील कस्तूराई मंगल कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पदवीधर मतदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. परंतु, या मेळाव्यास पदवीधर मतदारांपेक्षा कार्यकर्त्यांचीच अधिक गर्दी होती. मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कार्यकर्त्यांच्या गर्दीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हो, कार्यकर्त्यांची गर्दी होती. प्रचार कोण करीत असतो? कार्यकर्तेच ना, हेच कार्यकर्ते आता पदवीधरांपर्यंत जाऊन आमचा प्रचार करतील, अशी कबुली रावसाहेब दानवे पाटील यांनी दिली.

या पत्रकार परिषदेस खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड, माजी आमदार गोविंद केंद्रे, शिवाजीराव पाटील कव्हेकर, नागनाथ निडवदे, गुरुनाथ मगे, गणेश हाके यांची उपस्थिती होती. पुणे, नागपूर, अमरावती, धुळे, औरंगाबाद मतदार संघात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षक व पदवीधर मतदारसंघात आमचाच विजय निश्चित आहे, असे नमुद करुन रावसाहेब दानवे पुढे म्हणाले की, पाच वर्षांची फडणवीस सरकारची कामगिरी व एका वर्षाची महाविकास आघाडीची कामगिरीची तुलना आता लोक करीत आहेत. राज्यातील सरकार निष्क्रिय आहे.या सरकारने कोरोना संकटाच्या काळातही मदत दिली नाही. याउलट भाजपा सरकारने सुरू केलेल्या जनहिताच्या योजना बंद पाडल्या. कोरोनामध्ये तपासणी करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सरकारने सुरू केली होती.

त्याच पद्धतीने तुमची नोकरी तुमची जबाबदारी,तुमची शेती तुमची जबाबदारी,अशी धोरणे सरकारने आखली आहेत. सरकार म्हणून तुम्ही काही जबाबदारी घेणार आहात का? असा प्रश्न उपस्थित करुन जनतेचा संघटित असंतोष मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त होणार आहे. राज्यातील तीन पक्षाच्या सरकारचा कारभार विस्कळीत आहे. लोक सरकावर नाराज आहेत. तिन्ही पक्षाने एकत्रित निर्णय घेतला असता तर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळालीच नसती. भाजपाचे अदृश्य, दृश्य सर्व नेते बोराळकरांसोबत आहेत. बंडखोरांसोबत नाहीत, असा खुलासाही रावसाहेब दानवे यांनी केला.

भाजपाच्या फलकावरुन खासदार शृंगारे, आमदार अभिमन्यू पवार यांचे फोटो गायब
मराठवाडा पदवीधर मतदार संघातील भाजपा व मित्र पक्षाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ दि. २४ नोवहेेंबर रोजी येथील औसा रोडवरील कस्तूराई मंगल कार्यालयात पदवीधर मतदारांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळावास्थळी प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या स्वागत फलकावर खासदार सुधाकर शृंगारे व आमदार अभिमन्युु पवार यांचे फोटो नव्हते. त्याची मेळाव्यास्थळी एकच चर्चा होती.

मेळावा होता पदविधर मतदारांचा परंतू, मेळाव्यास लातूर जिल्ह्यातील भाजपाचे नेते, कार्यकर्त्यांनीच गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी आणलेल्या वाहनांची एकच गर्दी झाली होती. मेळावास्थळी प्रवेशद्वारावर स्वागत कमान उभी करण्यात आली होती. या कमानीवरील फलकावर एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उमेदवार शिरीष बोराळकर, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, नगरसेवक गुरुनाथ मगे, अरविंद पाटील निलंगेकर तर दुस-या बाजूला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे फोटो होते. मात्र खासदार सुधाकर शृंगारे, आमदार अभिमन्यु पवार यांचे फोटो नव्हते. याची एकच चर्चा मेळाव्यास्थळी होती.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ती आलीच तर अधिक नुकसानकारक असेल, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला गेल्याने कोरोना रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना अधिक सतर्कपणे करणे आवश्यक आहे. चेह-यावर मास्क किंवा रुमाल बांधणे, सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करणे, गर्दी टाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक असल्याचे केंद्र सरकार, राज्य सरकार व प्रशासन वारंवार सांगत असताना भाजपाच्या या मेळाव्यास्थळी मात्र सोशल डिस्टन्सिंगचा पुर्णत: फज्जा उडालेला दिसून आला. कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीत मोजक्याच कार्यकर्त्यांच्या चेह-यावर मास्क होता. सॅनिटायझरचा तर पत्ताच नव्हता. जिथे विवाहासारख्या आनंदाच्या क्षणाला ५० माणसांच्याच उपस्थितीचे बंधन असताना या मेळाव्याला झालेल्या गर्दीवर नियंत्रण कोणाचे?, अशीही चर्चा मेळाव्यास्थळी होती.

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या