लातूर : प्रतिनिधी
पावसाळा लवकर सुरु होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत असल्यामुळे प्रशासन आणि साखर कारखान्यानी युध्द पातळीवर यंत्रणा राबवून ३१ मे पुर्वी लातूर जिल्ह्यातील संपूर्ण ऊसाचे गाळप करावे, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतीक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सोमावारी पून्हा सबंधितांची तातडीची बैठक घेऊन दिले आहेत.
पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सोमवार दि. १६ मे रोजी सकाळी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन व सहकारी तसेच खाजगी साखर कारखाना व्यवस्थापनाची तातडीची बैठक घेतली. १३ मे रोजीच्या बैठकीतील निर्णयावर झालेल्या अमंलबजावनीचा यावेळी आढावा घेतला. जिल्ह्यातील साखर कारखान्याना त्यांच्या जवळपासची गावे विभागून देण्यात आलेली आहेत त्या संबंधिची माहिती घेतली. ठरवून दिलेल्या नियोजना प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यावेळेस दिले.
जिल्ह्यातील ऊस संपेपर्यंत निवासी जिल्हाधिकारी यांनी समन्वयक म्हणून काम पहावे त्यांना क्षेत्रीय अधिका-यांनी वेळोवेळी माहिती पूरवावी, सर्व साखर कारखान्याना जिल्ह्यातील गावे वाटून दिली आहेत, ठरवून दिलेल्या नियोजना प्रमाणे ऊसतोडणी यंत्रण राबवावी, ठरवून दिलेल्या परीसरातील ऊस संपल्या नंतरच शासनाच्या परवागीने कारखाने बंद करावेत, सभासद व बिगर सभासद असा भेदभाव न करता सर्व शिल्लक ऊसाचे गाळप करावे, परीसरात ऊस संपल्यानंतर तोडणी यंत्रणा इतर कारखान्याकडे सोपवावी, ऊसतोडणी यंत्रणा टिकवून ठेवण्यासाठी कारखान्यांनी प्रयत्न करावेत, शेजार जिल्ह्यातील हार्वेस्टर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे आदी निर्देशही पालकमंत्री अमित देशमुख यांनी या बैठकी दरम्यान दिले आहेत.
या बैठकीस जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, जागृती कारखान्याचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण मोरे, विलास सहकारी साखर कारखान्याचे
व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विलास कारखाना कार्यकारी संचालक संजीव देसाई, रेणा कारखाना कार्यकारी संचालक मोरे, टवेन्टिवन शुगसचे कार्यकारी संचालक समीर सलगर, जागृती कारखाना कार्यकारी संचालक सुनील देशमुख, संत मारुती महाराज कारखाना कार्यकारी संचालक दत्ता शिंदे, शेतकी अधिकारी कल्याणकर, जहागीरदार, जाधव, मिलींद पाटील आदी संबंधित विभागाचे अधिकारी सर्व कारखान्याचे पदाधिकारी उपस्थित होते.