लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात गेल्या दोन दिवसापासून वादळी वा-यासह गारांचा पाऊस होत आहे. शनिवारी दुपारी लातूर, रेणापूर, जळकोट, देवणी, निलंगा, चाकूर तालुक्यात वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे शेतात काढणीस आलेल्या गहू, ज्वारी, हरभरा पिक भिजले आहे. तसेच गारामुळे व वादळी वा-यामुळे आंब्याचे नुकसान झाले. तर गारामुळे पालेभाज्याही खराब झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
नुकसान भरपाई द्यावी
चाकूर : अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील पींकाचे मोठे नुकसान केले आहे. वादळी वारा, गारपीठ यामुळे हातात आलेली रब्बी पीक पुर्णत: उध्वस्त झालेले असुन शेतकरी धास्तावला असुन त्याचे आर्थिक कंबरडेच मोडले आहे. फळबागेसह, टमाटे याचेही मोठे नुकसान झाले आहे. याचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार सुधाकरराव शृंगारे, जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निलंगा तालुक्यात ज्वारी, गहू भुईसपाठ
निलंगा : प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील नणंद, गुंजरगा येळनुर, सिदखेड, बेंडगा अनसरवाडा, जामगा, धानोरा, मन्नतपूर, बामणी, माळेगाव, शिंगनाळ, जाऊ येथे दि. १८ मार्च रोजी पहाटे चार पासून सहा वाजेपर्यंत अवकाळी पाऊस पडल्यामुळे ज्वारी व गहू पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे.
खरीप पिक हातातून गेले असता सावकारांकडून कर्ज काढून रब्बी पिकाची पेरणी केली. हातात काहीतरी पडेल या आशेने शेतकरी राजा वाट पाहत होता. मात्र अवकाळी पावसामुळे हाता तोंडाशी आलेले पीक डोळयादेखत भुईसपाठ झाले. शेतक-यांचे लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे. गहू व ज्वारीचे पिके भुईसपाट झाले आहेत. तर औराद शहाजानसह परिसरातील हलगरा, चांदोरी, चांदोरीवाडी बोरसुरी, माकणी, सावरी तगरखेडा, हलगरा, मानेजवळगा, तांबाळा, तांबाळावाडी, कोयाजीवाडी, सोनखेड, हालसी आदी गावात सायंकाळी गारांचा पाऊस झाला. तर परिसरातील अनेक गावात वादळी वारा व वीजेचा कडकडाट सह पाऊस झाला.
यात तांबाळावाडी येथील शेतकरी दयानंद संग्रामप्पा बिराजदार यांच्या शेतातील गाईवर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला.निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह परीसरात शुक्रवारी रात्री व शनिवारी पहाटे व सायंकाळी वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. यात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यात वारा जोरात असल्याने नुकसान वाढले असून पावसाने बडीज्वारी, हरभरा, टमाटा, हिरवी मिर्ची, ढोबळी मिरची, कांदा, शेवगा आदी भाजीपाल्यासह टरबूज, खरबूज, द्राक्षे आदी फळबागांचे नुकसान झाले आहे. महावितरणच्या अनेक तारा तुटल्याने शनिवारी दुपार पर्यंत अनेक गावांचा व शेतीचा विजपुरवठा खंडित होता.दरम्यान औराद शहाजानी येथील हवामान केंद्रावर या पावसाची १४ मिलीमीटर नोंद झाल्याचे माहिती मापक मुक्रम नाईकवाडे यांनी सांगितले.
पंचनामे करण्याचे आदेश दिले
शासनाने अवकाळी पावसाने झालेल्या गहू व ज्वारी पिकाचे तात्काळ पंचनामे करून अनुदान द्यावे अशी शेतक-यांची मागणी आहे. युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांनी निलंग्याचे तहसीलदार व नायब तहशीलदार धुमाळ यांना फोनवरून नुकसानीची कल्पना दिली असता त्यांनी तलाठयांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले.