लातूर : लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांसह कर्नाटकातील सीमावर्ती भागात कृषी संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेल्या दर्श वेळा अमावस्येचा सण दि. १२ जानेवारी रोजी कोरोनाच्या सावटाखाली साजरा करण्यात आला. शेतक-यांसह सर्वांना सुखाचा घास देणा-या काळ्या आईप्रति शेतक-यांनी ऋण व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळ अमावस्या साजरी करताना उत्साह दिसला नसला तरी वन भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी शहर नागरिक शेत शिवारांत गेलेले होते. त्यामुळे शहरात अघोषीत संचारबंदी असल्यासारखी परिस्थिती झाली होती.
एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण करणा-या वेळ अमावस्या सणाला शिवार पूजा, वेळा अमावस्या, येळवस, अशा विविध नावाने ओळखला जाते. सृष्टीची आई म्हणून ओळखल्या जाणा-या काळ्या आईच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा सण साजरा केला जातो. मंगळवारी अगदी सकाळी शेतकरी आपापल्या शेताकडे निघाले. पारंपरिक बैलगाडीत भजी, अंबिल, गोडभात, आंबट भात, ज्वारी, बाजरीच्या भाकरी घेवून शेतकरी शेतावर पोहोचले. त्यानंतर पाहुणे, आप्त स्वकीय, मित्र परिवार आपापली दुचाकी, चारचाकी वाहनांनी शेतावर पोहोचले. दुपारपर्यंत शहर निर्मनुष्य तर शेत-शिवारं आबाल-वृद्धांनी गजबजून गेली होती. शेतक-यांनी भल्या सकाळी सहकुटूंब शेतावर जाऊन ज्वारीच्या कडब्याची खोप तयार केली. त्यात लक्ष्मी, पांडवांची प्रतिष्ठापना करुन पूजा केली.
येळवसनिमित्त विविध रुचकर खाद्य पदार्थ बनवले जातात. त्यात चन्याच्या पिठात विविध भाज्यांची मिसळ करुन तयार केलेली भजी हा मानाचा पदार्थ असतो. भजीसाठी हिरवी मटार, हरभरा, वालाच्या शेंगा, तुरीच्या शेंगातील हिरवे दाणे, काकडी किंवा वाळूक, वांगी, मेथीपाला, कोथिंबीर, कांदा पात, लसूण पात, गाजर, शेंगदाणे व आल्याचा वापर करतात. ज्वारीचा अंबट भात, फके वरण, तांदळाची खीर, भात, ज्वारी, बाजरीचे उंडे, ज्वारी, बाजरीची भाकरी, याशिवाय अनेक जण धपाटे, तिळाच्या पोळ्या करतात. हे सर्व खाद्य पदार्थ येळवसचा खास मेनू असतो. शेत-शिवरांनी आंगत-पंगत करुन या खास मेनूचा आस्वाद घेतला गेला. शेत शिवार माणसांनी फुलून गेले. परंतु ज्यांना शेतावर जाणे शक्य नव्हते, अशांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, विकासरत्न विलासराव देशमुख पार्क (नाना-नानी पार्क) मध्ये आपापले डब्बे आणून भोजनाचा आस्वाद घेतला.
बर्ड फ्लूची धास्ती अनेक घरांमध्ये मांसाहार वर्ज्य
झणझणित आंबिलचा आस्वाद
दर्श वेळा अमावस्येचा आणखी एक महत्वाचा मेनू म्हणजे आंबील. चार-पाच दिवसांचे आंबट दह्याचे ताक केले जाते. त्यात थोडेसे ज्वारीचे पीठ शिजवून टाकले जाते. मीठ, जिरेपूड, कोथिंबीर, आले, लसणाचे वाटण आणि मिरची पावडर त्यात टाकतात. ती मडक्यात ठेवतात. तत्पूर्वी मडके चुन्याने रंगवले जाते. आंबीलची मजा आणि त्यामुळे येणारी जराशी गुंगी काही औरच असते.
बाभळगावात दर्श वेळ अमावस्या उत्साहात साजरी
बाभळगावात दर्शवेळ अमावस्या प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने विधीवत पुजन करुन कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर घरगुती स्वरुपात उत्साहात साजरी केली. शेतकरी बांधव चिंतामुक्त होऊन शेतात समृद्धी, सुबत्ता लाभावी, अशी प्रार्थना देशमुख कुटुंबियांनी यावेळी केली. बाभळगावात वेळ अमावस्या दरवर्षी उत्साहात साजरी केली जाते. लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे दरवर्षी आवर्जून वेळ अमावस्या साजरी करण्यासाठी बाभळगावात येत असत. ती परंपरा तशीच पुढे सुरु असून आमदार धिरज विलासराव देशमुख आणि सौ. दीपशिखा धिरज देशमुख यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात
आले.
यावेळी श्रीमती विजयाबाई दाजीसाहेब देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, सौ.सुवर्णाताई दिलीपराव देशमुख, अनुराधा गणपतराव देशमुख, सोनाली राजेश्वरराव देशमुख, अभिजित देशमुख, सौ.सारिका देशमुख, सत्यजित देशमुख, वृषाली देशमुख, चि.अविर, चि.वंश, चि.अवान, कु. दिव्याना यांच्या उपस्थितीत यावेळी पूजन संपन्न झाले.