लातूर : प्रतिनिधी
संपुर्ण राज्यभरात मिसींगच्या केसेस वाढत आहेत. प्रारंभी मिसींग केस म्हणुन नोंद झालेल्या श्रद्धा वालकरचे प्रकरण तपासानंतर किती भयावह प्रकार घडला हे सर्वाच्या समोर आले आहे. त्यामुळे मिसींगच्या केसेस तातडीने हाताळावेत, असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या दोन दिवसाच्या लातूर जिल्हा दौ-यावर होत्या. गुरुवारी दुपारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
एखादी घटना घडल्यानंतर त्याचा तपास केला जातो परंतू, घटनाच घडू नये, यावर काम केले पाहिजे, असे नमुद करुन रुपाली चाकणकर म्हणाल्या, राज्यातील मिसींग केसेससाठी राज्य महिला आयोग जानेवारीपासून पाठपुरावा करीत आहे. मिसींग सेल अॅक्टीव झाला पाहिजे. मिसींग केसेस तातडीने हाताळले तर पुढील अप्रिय घटना टाळता येऊ शकतात, असेही त्या म्हणाल्या.
महिला आर्थिक विवंचनेत असतात किंवा त्यांच्याकडे माहितीचा अभाव असतो. म्हणून राज्य महिला आयोगाने महिला आयोग आपल्या दारी, हा उपक्रम सुरु केला आहे. याद्वारे महिलांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे नमुद करुन रुपाली चाकणकर म्हणाल्या, बालविवाह रोखणे, अवैध गर्भपात रोखण्यासाठी सोनोग्राफी सेंटरची तपासणी करणे, हुुंडाबळी, कौटूंबिक हिंसाचार, सायबर गुन्हे, छेडछाडीविरोधी पाहणी, आदी कामे करीत असतानाच महिलांना संजिवणी अभियान, बालसंगोपणसह शासनाच्या महिलाविषयक विविध योजनांची माहिती देणे, आदी कामे केली जात आहेत.
महिलांना मोफत सीटीबस प्रवास, राज्यातील आदर्श उपक्रम
लातूरमध्ये महिलांना मोफत सीटीबस प्रवासाचा उपक्रम राबविला जातो. हा राज्यातील एक आदर्श उपक्रम आहे. हा अभिवन उपक्रम कसा राबवता, कोणत्या योजनेतून राबवता, हा उपक्रम राबवणे परवडते काय?, याचा सविस्तर अहवाल मागविला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो अहवाल राज्य शासनासमोर मांडून महिलांना मोफत सीटीबस प्रवास देण्याचा हा उपक्रम संपूर्ण राज्यभरातील महिलांसाठी राबविण्यासाठी प्रयत्न करु, असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.