लातूर : प्रतिनिधी
येथील कृषी महाविद्यालयात विद्यार्थी समुपदेशन व नियुक्ती कक्षातर्फे प्रक्षेत्रावर आधुनिक पद्धतीने ड्रोनद्वारे फवारणीची प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यासाठी गरुडा एरोस्पेस, चेन्नईचे सहकार्य लाभले. या वेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या बद्दल माहिती घेतली. कीटक रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येणार आहे. ड्रोन व आत्याधुनिक यंत्राचा वापर उपयुक्त असून त्यामुळे शेतक-यांचे कष्ट कमी होऊन वेळेचीही बचत होणार आहे, असे मत कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी व्यक्त केले.
नियमित फवारणीच्या संपर्कात आल्यामुळे शेतक-यांना विविध व्याधी जसे त्वचारोग, विषबाधा वगैरे होतात. त्रास सहन करावा लागतो. मात्र ड्रोन फवारणीमुळे या सर्व बाबींवर याद्वारे मात करता येईल. या अत्याधुनिक फवारणी पद्धतीने फवारणी केल्यास औषधांची मोठ्या प्रमाणात बचत होते. ही पद्धत इतर फवारणी पद्धतीपेक्षा ५० टक्के अधिक कार्यक्षम आहे, असे
गरुडा एरोस्पेसद्वारे सांगण्यात आले.
विविध प्रकारच्या कीड नियंत्रणासाठी कीटकनाशके फवारणी करावी लागतात. परंतु तज्ज्ञ मनुष्यबळ अलीकडे उपलब्ध होत नाही. त्यामुळे मजुरांची प्रचंड वानवा आहे. अशास्त्रीय वापराने शेतकरी, शेतमजुरांचे बळी जात आहेत. यामुळेच यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. विशेषत: पिकावरील कीटकनाशकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येईल. यामुळे फवारणी करताना प्रभावी अंमलबजावणी करता येईल. मानवी जिवाचा धोका सुद्धा कमी होऊ शकतो. सध्या हे ड्रोन यंत्र प्रात्यक्षिक प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आले.
गेल्या ६ महिन्यांपासून ड्रोनचा शेती व्यवसायात वापर करण्याबाबत केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्रमणी हे या केंद्रीय समितीचे चेअरमन आहेत. शेती व्यवसायात आत्याधुनिक यंत्राचा वापर वाढवून शेतक-यांची वेळ बचत व्हावी शिवाय कष्टही कमी करण्याच्या हेतूने ड्रोन शेतीवर भर दिला जात आहे. या प्रात्यक्षिक कार्यक्रमाप्रसंगी तंत्रज्ञान, हायटेक शेती आणि ड्रोन वापराबाबत मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमाला कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. हेमंत पाटील, डॉ. जगदीश जहागीरदार, डॉ. अरुण गुट्टे, डॉ. सचिन दिग्रसे, डॉ. विश्वनाथ कांबळे, डॉ. दिनेशसिंग चव्हान, डॉ. प्रशांत करंजीकर, डॉ. विलास टाकणखार, डॉ. व्ही. जगताप, डॉ. विजय भामरे डॉ. मुळेकर, डॉ. शिवशंकर पोले, डॉ. सुनिता मगर, डॉ. संतोष कांबळे, डॉ. दयानंद मोरे, डॉ. प्रभाकर अडसुळ डॉ. तांबोळी, संघर्ष श्रृंगारे तसेच इतर प्राध्यापक, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.