कासार सिरसी (नागेश पंडित ) : निलंगा तालुक्यातील नेलवाड येथील भारतीय सैन्य दलातील जवान अर्जुन (लखन) किसनराव धुमाळ (वय २४) हे कश्मीर खो-यात दोन वर्षापूर्वी बर्फात अडकल्यामुळे त्यांच्यावर पुणे येथे आर्मी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या दोन तीन महिन्यापासून सुरू असलेली त्यांची मृत्युशी सोमवारी दि. २३ रोजी संपली आणि त्यांना वीरमरण आले. अर्जुन धुमाळ हे सन २०१६ पासून भारतीय सैन्यात कार्यरत होते. दोन वर्षापूर्वी कश्मीर खो-यात बर्फात अडकल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती.
उपचारानंतर ते गावाकडे आले होते. त्यांची तब्येत ठीक झाल्यानंतर चार महिन्यापूर्वी ते परत सैन्यदलात कार्यरत झाले. त्यानंतर काही दिवसानी त्यांची प्रकृती परत खालावली त्यामुळे पुणे येथे आर्मी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांना वीर मरण आले. त्यांचे पार्थिव मंगळवारी दि. २४ रोजी त्यांच्या मूळ गावी नेलवाड येथे आणून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लातूर पोलिस व सैन्य दलाकडून बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी खासदार ओमराजे ंिलबाळकर, आमदार अभिमन्यू पवार , भाजप नेते अरविंद पाटील निलंगेकर, जि.प. सदस्य बजरंगदादा जाधव, नायब तहसीलदार अरुण महापुरे , पोलिस उप विभागीय अधिकारी नवले , सपोनि रेवनाथ डमाळे यांच्यासह आदींनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली.