चाकूर : मराठवाड्याच्या विकासात महाक्रांती आणणा-या व येथील तरुणांना रोजगाराची दारे खुली करणा-या लातूर येथील मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून नव्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणार असल्याची माहिती खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांना या प्रकल्पाच्या अधिका-यांनी दिली. खासदार श्रृंगारे यांनी या पार्श्वभूमीवर प्रकल्पस्थळी विभागीय रेल प्रबंधक शैलेश गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन झालेल्या व होत असलेल्या कामांचा अधिका-यांकडून आढावा घेतला तसेच प्रकल्पाची पाहणीही केली.
प्रकल्पाच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. लॉकडाऊनमुळे कर्मचा-यांची निवासस्थाने व इतर काही कामे उशिराने होत आहेत परंतु प्रत्यक्ष उत्पादनासाठी आवश्यक असणारी कामे पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष पुरविण्यात आले आहे. त्यासाठी युध्दपातळीवर यंत्रणा कामास लागली आहे. एकदरीत वस्तुस्थिती पहाता येत्या फेब्रुवारीत उत्पादन सुरू होऊ शकते, असे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक प्रकल्प अभियंता काशिनाथ गजरे, मोहम्मद शरीक, लायजंिनग ऑफिसर शरद सगर, सुनिल खटारकर हे उपस्थित होते. त्यांनी यावेळी विविध बाबींची खासदार महोदयांना माहिती दिली.
मराठवाड्यातील तरुणांसाठी झुकते माप
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, पंकजाताई मुंडे, आमदार अभिमन्यू पवार यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील बेरोजगारांसाठी या प्रकल्पात जागा आरक्षित ठेवण्याची मागणी केली होती. त्यानुसार या प्रकल्पात मराठवाड्यातील तरुणांसाठी ८० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रकल्प कार्यान्वित होत असताना टप्प्याटप्प्याने या जागा भरल्या जाणार असून त्यामुळे मराठवाड्यातील तरुणांना रोजगार मिळून बेरोजगारीची समस्या दूर होण्यास मोठा हातभार लागणार असल्याचे खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी सांगितले
एक देश, एक निवडणूक ही काळाची गरज