लातूर : प्रतिनिधी
धर्माला राजाश्रय महत्त्वाचा असतो. प्रभू रामचंद्र आणि शिवाजी महाराज हे राजे होते. राजा जो निर्णय घेतो त्याला राजनीती म्हटले जाते.राजनीती वाईट नाही हेच हिंदूंना पटवून देण्याची वेळ आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्या नीतीचा अवलंब करीत होते ती खरी राजनीती होय. कट-कारस्थाने करणे याला राजनीती म्हटले जात नाही. छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन राजनीती करा. राजनीती या शब्दाचा अर्थ बदलू देऊ नका. प्रजेवर संकट आल्यास तलवार उपसून उभा राहतो तो खरा राजा असतो. म्हणूनच आजही शिवाजी महाराजांच्या विचाराचा जयघोष केला जातो, असे विचार कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी मांडले.
सकल हिंदू बांधवांच्या वतीने आयोजित विराट हिंदू धर्म महासभेमध्ये मार्गदर्शन करताना कालीपुत्र कालीचरण महाराज बोलत होते. यावेळी महाराज म्हणाले की, साधू-संतांचे विचार वंदनीय आहेत परंतु केवळ साधुसंत सर्व काही देऊ शकत नाहीत. आपणास जे हवे आहे ते राजाकडून घ्यावे लागते. देशाला हिंदूत्ववादी विचाराचा राजा लाभल्यानंतरच राम मंदिराची उभारणी सुरू झाली. हजारो साधुसंतांनी आपल्या प्राणाची आहुती देऊनही आजवर मंदिराची उभारणी होऊ शकली नव्हती, असे ते म्हणाले की, हिंदू तरुणांनी स्वत:च्या शरीराकडे लक्ष द्यावे. व्यायाम करून शरीर आणि त्यासोबतच विचार मजबूत करावे. नंतर स्वत:चा परिवारावर आणि देशातील परिस्थितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन कालीचरण महाराज यांनी केले.
शिवतांडव स्तोत्राने धर्मसभेची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा खानापुरे, संचलन अॅड. पूनम पांचाळ तर आभार प्रदर्शन अजय रेड्डी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय रेड्डी, कृष्णा खानापुरे, मनोज डोंगरे, आदित्य देशमुख, गजेंद्र बोकन, श्रीकांत रांजणकर, ज्ञानेश्वर धनगर, पुनम पांचाळ, सूर्यसिंह राजपूत, विजय थोडगे, राहुल पाटील, नरेश खंडेलवाल, समाधान जाधव, योगेश चामे, प्रगती डोळसे, काजल जाधव, जानकी औताडे, अभिजीत चामे यांनी परिश्रम घेतले.