मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार : शासनस्तरावर पाठपुरावा तत्परतेने सुरू
लातूर : लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी लातूर औद्योगिक वसाहत (टप्पा-२) मध्ये औषध निर्मिती हब निर्माण करण्याचे जाहीर करुन त्या दृष्टीने शासनस्तरावर पाठपुरावा तत्परतेने सुरू केला आहे. या निर्णयामुळे लातूर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार असून यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार असल्याचे सांगून पालकमंत्री महोदयांच्या या निर्णयाचे लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी स्वागत केले आहे.
वाढती लोकसंख्या व त्या तुलनेत उपलब्ध असलेले रोजगार पाहता शहरी भागा सोबतच ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करुन देणे ही काळाची गरज बनली आहे. विकासरत्न विलासराव देशमुख यांनी याच दृष्टिकोनातून मांजरा परिवारातील साखर कारखान्याच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली होती.
हा विचार डोळ्यासमोर ठेवून लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी दि. १५ जून २०२० रोजी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांना पत्र लिहून औद्योगिक वसाहत (टप्पा-२) मध्ये टेक्नो मेडिकल झोन व औषध निर्मिती हब स्थापन करण्याची मागणी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्राचे महत्त्व नव्याने अधोरेखित झाले आहे. लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात युवक रोजगाराची संधी शोधत आहेत, अशावेळी औद्योगिकीकरणास चालना देऊन लघुउद्योग निर्मितीवर भर देणे गरजेचे आहे. औद्योगिक वसाहत (टप्पा-२) मध्ये टेक्नो मेडिकल झोन व औषध निर्मिती हब निर्मितीच्या मागणीस पालकमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या दृष्टीने शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. याबद्दल आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी त्यांचे आभार देखील व्यक्त केले आहेत.
युवकांना मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होणार
ग्रामीण भागात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे व औषध निर्मिती युवकांना मदतगार ठरणार आहे. युवकांना मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे़ वैद्यकीय क्षेत्रातील डेटा सेंटर, टेलीमेडिसीन सेंटर, वैद्यकीय विद्यार्थ्यांना अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरण्याचे प्रशिक्षण केंद्र निर्माण करता येऊ शकतात. यासाठी आवश्यक असणारे दळणवळणाची व्यवस्था, विमानतळ, राष्ट्रीय महामार्गाचे जाळे व ब्रॉडगेज रेल्वे मार्गाने लातूर जिल्हा परिपूर्ण असल्याने औद्योगिक वसाहत (टप्पा-२) मध्ये टेक्नो मेडिकल झोन व औषध निर्मिती हब निर्माण होऊ शकते असे पालकमंत्री महोदयांकडे केलेल्या मागणीत आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी वरील मुद्दे नमूद केले होते.
Read More सीएसची परीक्षा पुन्हा लांबणीवर : परीक्षा 18 ते 28 ऑगस्ट दरम्यान होणार