24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeलातूररुग्ण दुपटीचा कालावधी ७०० वरुन २५४ दिवसांवर

रुग्ण दुपटीचा कालावधी ७०० वरुन २५४ दिवसांवर

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ७०० दिवसांवर गेला होता. मात्र गेल्या आठवड्यापासून रुग्ण दुपटीचा कालावधी घसरला आहे. ७०० दिवसांवरुन २५४ दिवसांवर आला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा, हात वारंवार धुवावेत, गर्दीत जाणे टाळावे, असे जिल्हा आरोग्य यंत्रणे कडुन सांगण्यात आले.

गेल्या वर्षभरात लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणुने मुक्काम ठोकलेला आहे. कधी कमी तर कधी लक्षणिय रुग्णसंख्या लातूर जिल्ह्यात वाढत गेली. मध्यंतरी कोरोनाच्या मीटरची गती काहीं अंशी कमी झालेली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचे अनलॉकमध्ये रुपांतर करुन हळूहळू एक-एक क्षेत्राला मुभा दिली. काही महिन्यांत जनजीवन पुर्वपदावर आले. ज्यांना कोरोाना विषाणूच्या संसर्गाचा संशय आहे, अशाच लोकांची कोरोना तपासणी सुरु झाली. सर्दी, खोकला, घसा दुखी असे आजार असलेल्यांची तपासणी नियमितपणे सुरु झाल्याने जनसामान्यांचे जीवन अलबेल झाल्याचे चित्र निर्माण झाले.

परंतु, दि. २३ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढत गेली आहे. दररोज ५० च्या पुढे रुग्ण आढळत आहेत. एक महिन्यात ९८२ रुग्ण आढळले आहेत. रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये आढळलेल्या रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ६.२ टक्के आहे. प्रयोगशाळेतील चाचणीचा पॉझिटिव्हीटी रेट१४.८ टक्क्यांवर आहे. जो की, ५ पेक्षा कमी होता. सदर रुग्णवाढ २० टक्क्यांवर गेली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या सप्टेंबर महिन्यांत होती. त्यानंतर रुगसंख्येत घट होत गेली. मात्र फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्येत वाढ होत गेली आहे.

लातूर शहर व जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या संसर्गाच्या मीटरने गती घेतली आहे. रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट व आरटीपीसीआर टेस्टमधून येणारे आकडे चिंता वाढविणारे ठरत आहेत. असे असतानाही नागरिक स्वत:च्या आरोग्याप्रति गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. संसर्गाची गती अशीच राहिल्यास वैयक्तिक तसेच सार्वजनिक आरोग्यावर मोठे प्रश्न चिन्ह येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रारंभीचे दोन महिने कोरोनामुक्त असलेल्या लातूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग २६ हजाराच्या वर गेला आहे. शहरातील गर्दी आणि विनामास्क फिरणा-यांची संख्या धडकी भरवणारी आहे.

व्यापा-यांनी सुरक्षेकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. दुकानांतून होणारी गर्दी हा त्याचा पुरावा आहे. गर्दी सुपर स्पे्रडर ठरु शकते. मात्र प्रशासनाकडून हवी असलेली कार्यतत्परता अभावानेच दिसून येत आहे. मास्क न वापरणा-यांवर महापालिकेच्या वतीने केली जाणारी दंडात्मक जुजबी कारवाई वगळता जरब बसेल अशी कठोर कार्यवाही केली जात नाही. नियम असले तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होतो अहे.

वर्षभरात जिल्ह्यात ७१५ जणांचा कोरोनाने मृत्यू
गेल्या वर्षभरात म्हणजेच एप्रिल २०२० पासून आजपर्यंत लातूर जिल्ह्यात एकुण ७१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात ७१५ पैकी वेगवेगळे आजार असलेल्या व्यक्तींची संख्या ५१२ होती. तर आजार नसताना मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या २०३ आहे. मृतांमध्ये ७० वर्षापेक्षा अधिक वयाचे २९८, ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे २२०, ५० वर्षांपेक्षा अधिक वयाचे १०६ तर ५० वर्षांपेक्षा कमी वयांच्या ९१ जणांचा समावेश आहे. एकुण मृत्यूपैकी एक दिवसच उपचार होऊ शकलेले ५३, एक ते पाच दिवस उपचार केलेल्या ३४५, पाच ते दहा दिवस उपचार घेतलेल्या १८१ तर दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस उपचार घेऊन नंतर मृत झालेल्या व्यक्तींची संख्या १२३ एवढी आहे.

धास्ती लॉकडाऊनची, गांभीर्यमात्र नाही
कोरोनाचा कहर अनुभवल्यानंतर आणि बरीच आपली मानसे गमावल्यानंतरही त्यातून काही बोध घेतल्याचे नागरिकांच्या सध्याच्या वर्तनावरुन दिसून येत आहे. मास्कच्या वापराकडे, वैयक्तिक स्वच्छतेकडे, वैयक्तिक व सावर्जनिक आरोग्याकडे कानाडोळा केला जात आहे. लॉकडाऊन किती तारखेपासून आहे?, असे सहज विचारले जात आहे. त्यावर चर्चा झालीच तर नको रे बाबा लॉकडाऊन, अशी झटपट प्रतिक्रियाही दिली जाते. परंतू, कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची काळजी मात्र घेतली जात नाही. त्याविषयीचे गांभीर्य दिसून येत नाही.

महानगरपालिकेने केली शहरात फवारणी सुरु
महानगरपालिकेच्या वतीने शहरात फवारणीस प्रारंभ करण्यात आला आहे. दोन वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या सुरु असून धूर फवारणी तसेच कोरोना प्रतिबंधासाठी सोडियम हायपोक्लोराईडची फवारणीही केली जात आहे.

लातूर शहरातील कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील प्रत्येक भागात या फवारण्या केल्या जाणार आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी विविध भागात करण्यात येत आहे. याच्यासह डेंग्यू व मलेरिया यासारख्या आजारांना कारणीभूत ठरणा-या डासांच्या निर्मूलनासाठी धूर फवारणी केली जात आहे.

महानगरपालिकेचे कर्मचारी विविध भागात दोन्ही प्रकारच्या फवारण्या करत आहेत. आगामी काही दिवसात संपूर्ण शहरात ही फवारणी केली जाणार असून नागरिकांनी कर्मचा-यांना सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

नांदेड शहरातील व्यापा-यांचे सातच्या आत शटर बंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या