23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeलातूरवर्षभरात १० हजार रुग्णांचा सिटीस्कॅन तर ४५ हजार रुग्णांचा काढला एक्स-रे

वर्षभरात १० हजार रुग्णांचा सिटीस्कॅन तर ४५ हजार रुग्णांचा काढला एक्स-रे

एकमत ऑनलाईन

लातूर : शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील कोविड-१९ रुग्णांसाठी क्ष-किरण विभाग वरदान ठरला आहे. या विभागात मागील एक वर्षामध्ये तब्बल १० हजार ३६२ रुग्णांच्या सी. टी. स्कॅनचा विक्रमी टप्पा पार करण्यात आला आहे. त्याचबरोबर एक्स-रे तपासणीचा सुध्दा तब्बल ४५ हजार ७९४ इतका उच्चांक गाठण्यात आला असून या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील सर्वसामान्य गरजू रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाला असून यापुढील कालावधीत ही यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करण्याचा संस्थेच्या उद्देश असल्याचे मत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

कोविड-१९ च्या लाटेमध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये माहे जुन २०२० पासुन दिनांक ३१ मे, २०२१ रोजी पर्यंत अविरतपणे गरजु रुग्णांना माफक दरामध्ये सी. टी. स्कॅन तपासणी व एक्स-रे तपासणी उपलब्ध करुन देण्यात आली. विशेषत: कोविड-१९ रुग्णांसाठी तपासणीच्या दिवशीच अंतिम अहवाल रुग्णांना देण्यात येतो. तसेच सी. टी. स्कॅन तपासणीमध्ये किती स्कोर आहे यावरुन रुग्णांना कोरोना संसर्गाची लागण किती प्रमाणात झाली आहे याची माहिती त्वरीत मिळत असल्यामुळे रुग्णांना आवश्यक ते उपचार वेळेत मिळण्यास मदत होते, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

अतिदक्षता विभागातील रुग्णांसाठी एक्सरे तपासणीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. अतिदक्षता विभागातील ज्या रुग्णांना व्हेंटीलेटर व ऑक्सीजनची आवश्यकता आहे. तसेच ज्या रुग्णांचे सी. टी. स्कॅन करणे शक्य नाही अशा रुग्णांची जागेवरच (पोर्टेबल एक्स-रे) एक्स-रे करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त गरजु रुग्णांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, क्ष-किरणशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. बालाजी कोंबडे, उपअधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. निलिमा देशपांडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोषकुमार डोपे, अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. महादेव बनसुडे यांनी केले आहे.

संस्थेत सी. टी. स्कॅन व एक्सरे तपासणीची सेवा २४ तास उपलब्ध
माहे ऑगस्ट २०२० मध्ये सर्वाधीक ६४५३ रुग्णांची एक्स-रे तपासणी तर एप्रिल- २०२१ मध्ये उच्चांकी २१०३ रुग्णांचे सी. टी. स्कॅन करण्यात आले. उल्लेखनीय बाब म्हणजे या तपासणीदरम्यान कोविड-१९ संसर्गाची इतर रुग्णांना लागण होवू नये म्हणुन क्ष- किरणशास्त्र विभागामार्फत योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. या संस्थेमध्ये सी. टी. स्कॅन व एक्सरे तपासणीची सेवा २४ तास उपलब्ध करुन देण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.

दोन्ही गटातील व्यक्तींना उद्या दुस-या डोससाठीच मिळणार लस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या