27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूर‘एकमत’ ने मनामनांत संस्कार रुजवले

‘एकमत’ ने मनामनांत संस्कार रुजवले

एकमत ऑनलाईन

लातूर : लोकनेते विलासराव देशमुख यांनी एकमतची मुहूर्तमेढ रोवली. लहानपणापासून मी एकमत वाचत, पाहात आलेलो आहे. एकमतने सुरुवातीपासून मनामनांत संस्कार रुजवले. मुळातच एक चांगली पिढी घडावी, ज्यांच्याकडे जी कौशल्य आहेत, ती पुढे यावीत, जे घडते ते लोकांसमोर आणावे आणि वाईट घडू नये, यासाठी संदेश देण्याचे काम एकमतने केले आहे, असे गौरवोद्गार माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी काढले.

एकमतच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवार, दि. २० ऑगस्ट रोजी येथील स्व. दगडोजीराव देशमुख सभागृहात आयोजित स्नेहमेळावा आणि कृतज्ञता सन्मान सोहळ््यात ते बोलत होते. ज्याला हात लावला, त्याचे सोने व्हायचे, असे विलासराव देशमुख साहेबांचे कर्तृत्व होते. त्यातून एकमतची उभारणी झाली. मात्र, साहेबांच्या नंतर आता आईसाहेबदेखील एकमतची धुरा खंबीरपणे सांभाळत आहेत. खरे म्हणजे वृत्तपत्र चालविणे सोपे नाही. एका अंकासाठी जवळपास १८ रुपये खर्च येतो. तोच अंक १ ते ४ रुपयात उपलब्ध करून दिला जातो. तरीही ते यशस्वीपणे चालते हे विशेष आहे. त्यामुळे एकमतचे संपादक आणि त्यांच्या टीमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. दुसरी एक उल्लेखनीय बाब म्हणजे एकमतने कधीही कॉंग्रेसचे मुखपत्र होऊ दिले नाही. खरे तर हे संतुलन राखणे सोपे नाही. मात्र, संपादकांनी ते राखले आहे. खरे तर आज मीडियावर प्रचंड दबाव आहे. तरीदेखील एकमत कधीच एकतर्फी होऊ दिला नाही. उलट एकमतमधून सर्वांना न्याय देण्याची भूमिका आहे. हेदेखील कौतुकास्पद आहे, असेही ते म्हणाले.

२४ तास बुलेटिन सुरू करा
-‘एकमत’ने ऑनलाईन न्यूजची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आम्हाला तात्काळ बातम्या वाचायला मिळत आहेत. मात्र, यापुढे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून २४ तास बुलेटिनची सुविधा उपलब्ध करून द्यावी. लोकनेते विलासराव देशमुख साहेबांनी जे जगात घडले नाही, ते येथे करून दाखविले. एकमतनेही ते करून दाखवावे, अशी अपेक्षा विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केली. यासोबतच त्यांनी लातूर शहरातील एकाही राजकीय नेत्याचा गौरव केलेला नाही. पुढच्या वेळी याचा विचार व्हावा, असेही ते म्हणाले.

सन्मान सोहळा हा बूस्टर डोस
लोकनेते विलासराव देशमुख ही दातृत्वाची फार मोठी शक्ती होती. त्यामुळे जिथे जाईल, तिथे साहेबांचे अस्तित्व दिसते, अशी आठवण सांगत कॉंग्रेस नेते अभय साळुंके यांनी एकमतच्या कृतज्ञता सन्मान सोहळ््यात ज्यांचा सन्मान श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या उपस्थितीत झाला, त्यांच्यासाठी एक प्रेरणा म्हणून बूस्टर डोसच असल्याचे एकमतच्या कार्यक्रमात बोलताना म्हटले. माणूस जन्माला येतो, शिकतो, मोठा होतो, संसार करतो, प्रगती करतो. ही तर जगरहाटीच आहे. परंतु आपण जे करतो, त्याची एक स्वतंत्र ओळख बनली पाहिजे, असे सांगतानाच आजच्या सत्कारमूर्तींनी आपल्या कर्तृत्वातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो. त्यांची प्रगती अशीच उत्तरोत्तर होत राहो आणि प्रत्येक क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकिक वाढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

एकमतच्या रुपाने साहेबांचे विचार घराघरात : सूळ
४सांस्कृतिक क्षेत्रातील उत्तम कामगिरी करीत असलेल्या बालाजी सूळ यांना सन्मानित करण्यात आले. त्याने एकमतच्या माध्यमातून लातूरच्या मातातील कलाकारांना खरी ओळख मिळाली. एकमतमुळेच मी देखील घडलो, असे सांगितले. तसेच आदरणीय विलासराव साहेबांमुळे लातूरची खरी ओळख आहे., असे म्हटले. यावेळी त्याने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आवाजात नटसम्राट या चित्रपटातील संवाद हुबेहूब सादर करीत प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी त्याने आदरणीय विलासराव साहेबांवरील कविता सादर करून आठवणींना उजाळा दिला.
दिलदार राजाची आठवण
विलासरावजींचे नाव घेता,
दिलदार राजाची आठवण होते!
नुसताच रुबाब नव्हता त्यांचा,
साहेब प्रेमाची साठवण होते!
प्रेम वाड्यापुरते नव्हे,
जगाला पुरून उरले होते!
प्रेमाचे नाते साहेबांनी जणू,
मनामनात पेरले होते!!
बाभळगावचा देखणा वाडा,
नजर जराही हटत नाही!
साहेब वाड्यावर नसतील,
अशी गोष्टच मनाला पटत नाही!!

साहेबांच्या विचाराची कास धरली : कोरे
सांस्कृतिक क्षेत्रातील सन्मानार्थी किरण कोरे यांनी आपल्या मनोगतात विलास आणि विकास हे दोन समानार्थी शब्द आहेत. साहेबांनी दिलेल्या विकासाच्या मंत्रांना हाताशी घेऊन इथवर भरारी मारता आली आणि याची दखल एकमतने घेतली. याबद्दल एकमतचे आभार व्यक्त करतो, असे म्हटले.

एकमतकडून सन्मान म्हणजे साहेबांचा आशीर्वाद : पाटील
ह्याळकोट तालुक्यातील सरपंच चंद्रशेखर पाटील यांनी आपण लहान असताना आदरणीय विलासराव साहेबांनी दिलेल्या विचारांची आठवण करून दिली. पाटील म्हणाले की, साहेब नेहमीच तरुणांनी राजकारणात आले पाहिले आणि कायद्याचे शिक्षण घेतले पाहिजे, असे सांगत. आज आपण त्यांचा आदर्श डोळ््यासमोर ठेवून राजकारणात आलो आहोत. एकमतच्या वतीने जो सन्मान करण्यात आला, हा आदरणीय विलासराव साहेबांचा आशीर्वाद असल्याचे पाटील यांनी म्हटले. यावेळी त्यांनी माझे आदर्श लोकनेते विलासराव देशमुख, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि माजी मंत्री आमदार संजय बनसोडे असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. तसेच माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी देखील गावच्या विकासासाठी फंड दिल्याचे ते म्हणाले.

माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांचा शुभेच्छा संदेश
लोकनेते विकासरत्न मा. विलासराव देशमुख यांनी १९९१ या वर्षी स्थापन केलेला एकमत आपल्या प्रवासातील मैलाचा दगड पार करीत दि. २० ऑगस्ट २०२२ रोजी ३१ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. याचा मनस्वी खूप आनंद झाला. वाचक, जाहिरातदार, हितचिंतक, मार्गदर्शक व विक्रेते बंधूंनी एकमतवर आपले दैनिक म्हणून केलेल्या अलोट प्रेमामुळे व दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळे एकमतला हा पल्ला गाठण्याचे व ३१ वा वर्धापन दिन साजरा करण्याचे भाग्य लाभले. या गौरवाच्या, अभिमानाच्या, आनंदाच्या ऐतिहासिक क्षणाचा आनंद वृद्धिंगत करण्यासाठी व आपले स्नेहबंध आणखी दृढ करण्यासाठी माझ्या एकमत परिवाराला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, अशा शब्दांत माजी मंत्री सहकार महर्षि दिलीपराव देशमुख यांनी एकमतला शुभेच्छा संदेश पाठविला.

‘एकमत’ची नाळ सामाजिक बांधिलकीशी
वृत्तपत्र हा व्यवसाय असला, तरी या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. तसेच एकमतने जनतेचा आवाज म्हणून काम केले पाहिजे, असा संदेश लोकनेते विलासराव देशमुख यांनी दिलेला आहे. त्यामुळे एकमतने कायम हे मूल्य जपलेले आहे. याच कारणामुळे आपल्या लोकांशी जोडलेली नाळ दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे, असे एकमतचे संपादक मंगेश देशपांडे डोंग्रजकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. कोरोनासारखे जागतिक संकट चांगलेच भेडसावत होते. मात्र, या कठीण परिस्थितीतून बाहेर पडत एकमतने पुन्हा भरारी घेतली. यापुढेदेखील लोकनेते विलासराव देशमुख साहेबांनी रुजविलेला वसा पुढे घेऊन जाण्यास एकमत कटिबद्ध असून, त्याचाच एक भाग म्हणून कृतज्ञता सन्मान सोहळा घेत आहोत, असेही डोंग्रजकर म्हणाले.

 

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या