लातूर : प्रतिनिधी
शुन्य ते १८ वयोगटातील बालकांच्या आरोग्याची तपासणीसाठी शासनामार्फत लातूर जिल्ह्यात३ राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबविला जात आहे. शाळा आणि अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. या योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील २ लाख ६१ हजार १५ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे ८५ टक्के उद्दिष्ट पुर्ण करण्यात आले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम २००९ पासून राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आतापर्यंत अनेक बालकांवर यशस्वी शस्त्रक्रीया करण्यात आल्या आहेत. तर किरकोळ आजारासंदर्भातही मोफत उपचार करण्यात आले असून ३० पथके तपासणीसाठी जिल्ह्यात कार्यरत आहेत. एका पथकामध्ये दोन डॉक्टर्स, एक परिचारिका आणि एक फार्मासिस्ट यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून बालकांची तपासणी आणि उपचार केले जात आहेत. गरज पडल्यास शस्त्रक्रिया केल्या जातात.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील २ लाख ६१ हजार १५ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यातील १५ हजार ८६३ विद्यार्थ्यांवर किरकोळ उपचार करण्यात आले. दहा महिन्यांमध्ये सर्व शाळा, अंगणवाड्यांतील ० ते १८ वयोगटातील मुला-मुलींची तपासणी करण्यात आली. अंगणवाडीतील तपासणीमध्ये १ लाख ७७७ बालकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीचे ९१ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. यातील ८ हजार ५६७ बालकांवर किरकोळ उपचार करण्यात आले आहेत. काही बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमांतर्गत गरज असलेल्या बालकांवर मुंबई येथे शस्त्रक्रिया झाली.