लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतुदी नुसार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या वतीने अधिसभेसाठी (सिनेट) निवडून द्यावयाच्या पदवीधर मतदारांसाठी ऑनलाइन नोंदणीसाठी ३० जून ही अखेरची तारीख होती.तथापि विविध स्तरावरून नोंदणीची मुदतवाढ करण्याची मागणी केली होती. त्यामुळे अधिसभा निवडणूक २०२२ पदवीधर निवडणूक मतदार नोंदणीसाठी ११ जुलै २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
पदवीधर गटातून पाच खुल्या प्रवर्गातील व पाच राखीव प्रवर्गातील अधिसभा सदस्य हे सभागृहात निवडून जात असतात. यांना मतदान करण्यासाठी १९९७ नंतरचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पदवीधर व १९९७ पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबादच्या पदवीधरांना मतदानाचा अधिकार आहे. इतर विद्यापीठातील पदवीधरांना मतदान करण्याचा अधिकार नसतो.
मतदार नोंदणीसाठी पदवीची सत्यप्रत, आधार कार्ड ,स्वाक्षरीचा नमुना व फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात. यासाठी तात्पुरते पदवी प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक हे ग्रा धरले जात नाही. विद्यार्थी हिताच्या या निवडणुकीत अधिक अधिक पदवीदारांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करावे असे आवाहन दयानंद कला महाविद्यालयाचे प्राध्यापक व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेडचे अधिसभा सदस्य डॉ. संदिपान जगदाळे यांनी केले आहे.