जळकोट : जळकोट तालुक्यातील रावणकोळा परिसरामध्ये रविवारी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास वादळी वा-यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. रावणकोळा येथील शेतकरी आपल्या बैलांसह पाऊस येत असल्यामुळे घराकडे येत असताना अंगावर वीज कोसळून शेतक-याचा जागीच मृत्यू झाला तर एक बैलही दगावला आहे.
जळकोट तालुक्यातील रावणकोळा येथील मारुती गणपत वाघमारे (वय ५५) हे पेरणीची कामे करण्यासाठी शेताकडे गेले होते. अचानक दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान पाऊस सुरू झाल्यामुळे ते घराकडे परत येत होते.
घराकडे परत येत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली व ते जागीच गतप्राण झाले. तसेच त्यांच्या सोबत औताला जुंपलेल्या असलेल्या एका बैलावरही वीज कोसळली यामध्ये बैलही जागीच गतप्राण झाला .
मयत मारुती गणपत वाघमारे यांच्या पश्चात आई वडील, दोन मुले, मुलगी, पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने रावणकोळा गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच जळकोट पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला तसेच पशुवैद्यकीय अधिकारी श्रीमती नामवाड यांनीही घटनास्थळी पोहोचून वीज पडून गतप्राण झालेल्या बैलाचा पंचनामा केला.