लोहारा : तालुक्यातील जेवळी शिवारात वीज अंगावर पडून शेतकरी ठार झाल्याची घटना बुधवारी दि. ८ जून रोजी रात्री ९ वाजता उघडकीस आली आहे. बलभीम माळाप्पा कागे (वय ५९) असे शेतकर्याचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी वादळी वार्यासह पाऊस पडत असल्याने शेतकरी बलभीम कागे झाडाखाली बसले होते.
याबाबत पोलीसांनी सांगितलेली माहिती अशी की, जेवळी येथील शेतकरी बलभीम माळाप्पा कागे हे बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शेतातील काम उरकून घराकडे जनावरे घेवून येत होते. त्यावेळी अचानक मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरूवात झाली. ते शिवारातील महादेव पाटील यांच्या यांच्या आंब्याच्या झाडाखाली जनावरांसह आश्रयासाठी थांबले असता अंगावर वीज पडून जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.नेहमीप्रमाणे संध्याकाळी ते घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता जेवळी शिवारातील महादेव पाटील यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दि. ९ जून रोजी सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची लोहारा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पोलीस नाईक डी.पी.गायकवाड पुढील तपास करीत आहेत.