उदगीर : सध्या शेतक-याची पेरणीसाठी घाई सुरू झाली आहे. एका बाजूला शेतीच्या मशागतीची तयारी तर दुस-या बाजूला खते आणि बियाणे खरेदीसाठी धावपळ ,अशी परिस्थिीती निर्माण झाली आहे. कोणत्याही क्षणी मान्सून येऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे शेतक-यांनी गती घेतली आहे. या गतीचा गैरफायदा व्यापा-यांनी घेऊ नये. शेतक-यांना अत्यंत दर्जेदार खते आणि बियाणे उपलब्ध करून द्यावेत. अन्यथा व्यापा-यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. असा इशारा उपविभागीय कृर्षी अधिकारी आर.टी जाधव यांनी दैनिक एकमतला बोलताना दिला.
हवामान खात्याचा अंदाज आणि व कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे उदगीर तालुक्यातील शेतकरी पेरणीपूर्व शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. तालुक्यातील खरिपाचे एकूण क्षेत्र ६३ हजार तीनशे हेक्टर असून त्यातील ४४ हजार ५७० हेक्टर वर सोयाबीनचा पेरा होत असतो. उदगीर देवणी, जळकोट, चाकुर, अहमदपूर तालुक्यातील शेतक-यांचे नगदी पीक म्हणून सोयाबीन आहे. त्यामुळे खरिपामध्ये कृषीचे आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये अवलंब करून शेतक-यांंनी उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही आवाहनही याप्रसंगी जाधव यांनी केले.गेल्यावर्षी काही प्रमाणात बोगस बियाणे विकले गेल्यामुळे शेतक-यांची मोठी गोची झाली.
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतक-याला फसविणे म्हणजे अक्षरश: राष्ट्रद्रोह आहे. त्यामुळे कोणीही शेतक-याला फसवण्याचा प्रयत्न करू नये. शेतक-यांना वेळेवर व दर्जेदार गुणवत्तापूर्ण बियाणे व रासायनिक खते उपलब्ध करून देणे याबाबत आवश्यक सूचना आपण उपविभागीय कृषी अधिकारी यांना दिलेल्या आहेत. तसेच निकृष्ट दर्जाची कृषी निविष्ठा पाच तालुक्यात आढळून आल्यास संबंधित कंपनीवर नियमाप्रमाणे कठोर कारवाई करण्याबाबत आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. खरीप हंगामातमध्ये दर्जेदार कृषी निविष्ठांची साठवणूक होणार नाही, याकरिता भरारी पथकांची स्थापना करून तालुकास्तरावर २४ तास तक्रार निवारण कक्षाची स्थापना करून शेतक-याच्या अडचणी वेळेत सोडविण्याच्या सूचनाही या प्रसंगी दिल्या आहेत. शेतक-यांनी अधिक उत्पादनाकरिता युरिया, सिंगल सुपर फास्फेट! २०: २०: 0, १३ :१८: १८, १० :२६ :२६ या खताचा योग्य कृषी शास्त्रीय पद्धतीने वापर केल्यास डीएपी च्या वापरापेक्षा अधिक उत्पन्न मिळते, याबाबतचा प्रचार आणि प्रसार शेतक-यामध्ये करण्याच्या सूचना उदगीर उपविभागीय कृषी अंतर्गत येणा-या पाच तालुका कृषी अधिकारी यांना दिलेल्या आहेत.
दुबार पेरणीचे संकट टाळण्याकरिता तालुक्यात पेरणीयोग्य म्हणजेच ७० ते १०० मीलीमीटर पाऊस झाल्यासच बियाणांची बीज प्रक्रिया उगवण क्षमता तपासून पेरणी करून शेतक-यांनी आर्थिक उत्पन्न साधावे. असे आवाहनही याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी आर.टी.जाधव यांनी केले आहे. तसेच सर्व शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम २०२२ करिता खते, बियाणे ,औषधे खरेदी ही परवाना धारक कृषी सेवा केंद्रातून खरेदी करावीत.खते खरेदी करते वेळेस पॉसमशीन मधील पावती घ्यावी. तसेच खताच्या गोणी वरील छापीलकिंमत पाहावी.
कृषी केंद्र वक्रिेता यांच्याकडील असलेला साठा व दर फलक पाहावा. बियाणे खरेदी करताना पक्की पावती घ्यावी. व बियाणे पिशवी खालच्या बाजूने फोडावी व हंगाम संपेपर्यंत रिकामी पिशवी जपून ठेवावी. तपासणी केल्यानंतरच कोणतेही बियाणे पेरणीसाठी वापरावे. किमान ७० टक्के उगवण क्षमता असल्याची खात्री करावी. किटकनाशके, तणनाशके पक्की पावती वरच खरेदी करावीत. अनधिकृत खते, बियाणेविक्र्रीवर कारवाई करणार अनधिकृतरित्या कोणी खते, बियाणे विक्री करीत असल्याचे आढळून आल्यास नजीकच्या कृषी विभागाच्या अधिका-यांना , कर्मचा-यांना संपर्क साधून त्यांना माहिती द्यावी. जेणेकरून अशा पद्धतीची शेतक-याची फसवणूक करणा-या आणि बोगस खते, बियाणे विकणा-या विरुद्ध योग्य ती कारवाई करता येईल. असेही आवाहन याप्रसंगी आर.टी.जाधव उपविभागीय कृषी अधिकारी यांनी केले आहे.