निलंगा : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसात अतिवृष्टी झालेल्या शेतक-यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतक-यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. तरी शेतक-यांंनी धीर धरावा, राज्य शासनाकडून शेतक-यांना अतिवृष्टीच्या काळात झालेल्या नुकसानीची दिलासादायक मदत मिळेल, अशी ग्वाही मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन व इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
निलंगा येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीच्या अनुषंगाने आढावा बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार बोलत होते. यावेळी आमदार धिरज विलासराव देशमुख, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव त्यांच्यासह सर्व तालुकास्तरीय यंत्रणा प्रमुख उपस्थित होते. मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार पुढे म्हणाले की, या आपत्तीच्या काळात सर्व शेतक-यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून शासनाकडून त्यांना आवश्यक ती सर्व मदत दिली जाणारच आहे.
तसेच राज्य शासनाने तीन दिवसापूर्वी केंद्र शासनाला राज्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष पाठवण्याची व एनडीआरएफच्या निकषानुसार नुकसानग्रस्त शेतक-यांना भरीव मदत देण्याची मागणी केलेली आहे असे त्यांनी सांगितले.लातूर जिल्ह्यात खरिपाचे ६ लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्र असून सप्टेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात झालेला सततचा पाऊस व मागील तीन-चार दिवसातील अतिवृष्टी यामुळे जवळपास दोन लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतीपिकांचे अत्यंत सूक्ष्मपणे पंचनामे पुढील तीन दिवसात करुन शासनाला अहवाल सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसनमंत्री वडेट्टीवार यांनी दिले.
नळगीर तालुका उदगीर, जळकोट या भागातील शेती पिकाची पाहणी मदत व पुनर्वसन मंत्री श्री वडेट्टीवार यांनी केली तर निलंगा तालुक्यातील सोनखेड या गावातील पीक नुकसानीची पाहणी करुन येथे उपस्थित शेतक-यांना धीर दिला व शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी आमदार धीरज देशमुख निलंगा विधानसभेचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे ही उपस्थित होते.
जळकोट तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा
जळकोट तालुक्यात सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील कापूस, उडीद, मुग, सोयाबीन, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे. तेव्हा शेतक-यांना तात्काळ अर्थिक मदत करण्याची गरज असून, जळकोट तालुक्यातील सरसकट पिकांचे पचंनामे करून ,तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी जळकोट तालुका काँग्रेसच्या वतीने राज्याचे मदत व पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे एका निवदेनाद्वारे केली असता त्यांनी शेतक-यांना महाविकास आघाडीचे सरकार मदत करणार आहे, असे आश्वासन दिले. याप्रंसगी उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी, यांनी ना.वडेट्टीवार यांचे लातूर जिल्हा सीमेवर स्वागत केले.
ना.वडेट्टीवार हे नांदेड येथून जळकोट मार्गे उदगीरकडे जात असतांना काँगे्रस कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली यावेळी काँगे्रसचे नेते अभय साळुंके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जून आगलावे, विलासराव देशमुख युवा मंचचे जिल्हा उपाध्यक्ष मारोती पांडे, जि.प.सदस्य संतोष तिडके, संचालक बाबुराव जाधव, माजी सभापती धोंडीराम पाटील, राष्ट्रवादीचे गोविंद भ्रमन्ना, गजानन दळवे पाटील, नगरसेवक महेश धुळशेट्टे, शिवसेना तालुकाप्रमुख टाले,डॉ. चंद्रकांत काळे, बाबा घोणसे, नगरसेवक राजीव डांगे, प्रदीप काळे, शंकर धुळशेट्टे, दयासागर दाडगे,सिद्धार्थ सुर्यवंशी, शिंगाडे संपत, तिलमिलदार माधव, सुनिल काळे, जाफर घडुसाब, सुनिल अव्वलवार, बालाजी आगलावे, मंगेश गोरे, धनंजय भ्रमन्ना, योगेश सोप्पा,पांडुरंग माने, बालाजी थोंटे, बालाजी बनसोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .
नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक पाठविण्याची विनंती
अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतक-यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तुम्ही खचू नका महाविकास आघाडीचे सरकार तुमच्या पाठीशी आहे. अशी ग्वाही मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी रविवारी निटूर येथील शेतक-यांना दिली. शिवाय केंद्रीय पथकाकडून पाहणी करण्यासाठी विनंती करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार निटूर ता. निलंगा येथील शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी वडेट्टीवार म्हणाले की अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून पाण्याच्या प्रवाहामुळे शेतक-यांची जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी रब्बी हंगामातील पीक येणे मुश्कील होणार असून शेतक-यांनी अशा परिस्थितीत खचून जाऊनये. याबाबत केंद्राकडे पत्र पाठविण्यात आले
यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, काँग्रेसचे युवा नेते अभय साळूंके, प्रभाकर बंडगर, उपविभागीय आधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास आधिकारी अमोल ताकभाते, कृषीअधिकारी राजेंद्र काळे आदी उपस्थित होते. यावेळी निटूर (ता. निलंगा) येथे माजी पंचायत समिती सदस्य सुरेंद्र धुमाळ, दिलीप हुलसुरे, राजाभाऊ सोनी, अनिल सोमवंशी, नूर पटेल यासह आदी शेतक-यांनी विविध मागण्याचे निवेदन दिले. निवेदनात शेतक-यांना सरसकट पंचनामे करून मदत करावी, अतिवृष्टीमुळे गावातील अंतर्गत रस्ते व शेताला जाणारे पाणंद रस्त्याची नुकसान झाले आहे. या रस्ता दुरुस्तीसाठी निधी देण्यात यावा शेतक-यांना सोयाबीनचे नुकसान भरपाई देण्यात यावी यासह आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.