26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeलातूरकिरकोळ बाजारात टोमॅटोची पन्नाशी!

किरकोळ बाजारात टोमॅटोची पन्नाशी!

एकमत ऑनलाईन

लातूर : गेल्या महिन्यात दि. २७ व २८ सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे पडसाद अद्यापही थांबलेले नाहीत. अतिपावसाने टोमॅटोची नासाडी झाली. टोमॅटोची परतवारी चांगली राहिली नाही. त्यामुळे आहे तो टोमॅटो बाजारात येत आहे. परिणामी टोमॅटोची आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात टोमॅटोने पन्नाशी गाठली आहे. तसेच इतर भाजीपालाही महागला असून भाजीपाला खरेदी करताना नागरीक हात जरा आखडताच घेत आहेत.

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कवडीमोल दरामुळे लातूर जिल्ह्यातील असंख्य शेतक-यांनी टोमॅटो अक्षरश: फेकून दिले होते. हाच टोमॅटो आता महागला आहे. बाजारात टोमॅटोची आवक कमी झाली असून महिन्यापुर्वी प्रतवारीनूसार १० ते २० रुपये किलोने विक्री झालेला टोमॅटो आज ५० ते ६० रुपये किलोने विकला जात आहे. दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोची मुबलक लागवड झाली होती. मात्र, मागणी कमी झाल्याने टोमॅटोचे दर कोसळले होते.

घाऊक बाजारात प्रतवारीनूसार दहा किलो टोमॅटोला गेल्या महिन्यात १० ते १५ रुपये दर मिळत होता. त्यामुळे उद्विग्न झालेल्या शेतक-यांनी टोमॅटो फे कून दिल्याच्या घटना ठिकठिकाणी घडल्या होत्या. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढलेला असताना कवडीमोल दर मिळाल्याने शेतक-यांनी टोमॅटो फेकुन दिले होते. अपेक्षित दर मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतक-यांकडून लागवड कमी प्रमाणात करण्यात आली. पितृपक्षात टोमॅटोला फारशी मागणी नव्हती. सध्या मात्र बाजारात मागणीच्या तुलनेत टोमॅटोची आवक कमी होत आहे. त्यामुळे टोमॅटोला चांगला दर मिळत आहे. दोन महिन्यांपूर्वी टोमॅटो उत्पादक शेतक-यांना नुकसानीला सामोरे जावे लागले होते. मागणी नसल्यामुळे गेल्या महिन्यात शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र, आता घाऊक बाजारात टोमॅटोला चांगला दर मिळत आहे.

घाऊक बाजारात एक किलो टोमॅटोला प्रतवारीनूसार ३५ ते ४० रुपये दर मिळत आहे. हमाली आणि वाहतूक खर्च वगळून शेतक-याला एक किलो टोमॅटोमागे २५ ते ३५ रुपये मिळत असल्याने अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना नुकसानीनंतर अपेक्षित दर मिळत आहे. लातूर शहराच्या बाजारपेठेत शहराच्या आसपासच्या शेतक-यांचाच टोमॅटो येत आहे. सध्या टोमॅटोसह सर्वच भाज्याचे दर वाढले आहेत. वांगे, बटाटे, भोपळा, शेवगा, गवार, चवळी, कारळं, दोडका, फुलकोबी, पत्ताकोबी, मेथी, शेपू, पालक, चुका या सर्वच भाज्या महागल्या आहेत.

जिल्ह्यातील टोमॅटो शेजारील राज्यात
लातूरच्या बाजारपेठेत टोमॅटोला चांगला दर मिळत असला तरी त्यापेक्षा चारपैसे तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेशात अधिक मिळत असल्यामुळे लातूर जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी शेजारील प्रांतात टोमॅटों विक्रीसाठी जात आहेत. टोमॅटोसोबतच कोथिंबिरीनेही चांगलाच भाव खाल्ल्याने कोथिंबिरीचाही शेतक-यांना चांगला आधार मिळत आहेत. किरकोळ आजारात कोथिंबीर २०० रुपये किलो तर घाऊक बाजरात १५० रुपये किलोने कोथिंवीर विकली जात असल्याची माहिती भाजीपाला विक्रेते इब्राहीम बागवान यांनी दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या