26.1 C
Latur
Tuesday, January 26, 2021
Home लातूर अग्निशमन सुरक्षा यंत्रणा रडारवर

अग्निशमन सुरक्षा यंत्रणा रडारवर

एकमत ऑनलाईन

लातूर (एजाज शेख ) : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या आगीच्या दुर्घटनेची दखल आता सर्वत्रच घेतली जात आहे. त्यातच जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सर्व सरकारी, खाजगी रुग्णालयांनी फायर ऑडीटची कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. एकच खळबळ उडाली आहे.. अग्निशमन सुरक्षा यंत्रणा ही तशी लौकीक आर्थाने दुर्लक्षीत बाब समजली जाते. परंतु एखादी दुर्घना घडल्यानंतर ही यंत्रणा किती महत्वाची आहे, हे अधोरेखीत होते. चार-आठ दिवस त्या विषयाच्या संबंधाने आदेश निघतात, चर्चा होते. सूचना दिल्या जातात आणि परत जैसे थे… होऊन जाते. खरे तर अग्निशमन सुरक्षा उपाययोजना न केल्यामुहे मोठ्या प्रमाणात जिवीत हानी झाल्याचे भरपूर उदाहरणे आहेत. अशा घटनेत आग प्रतिबंधात्मक उपाययोजनांनी संकटकालीन मार्ग सुनिश्चित करणे अत्यंत महत्वाचे असून याबाबतीत आवश्यक अशा उपायोजना केल्यास अशा प्रकारच्या दुर्घटना टाळता येऊ शकतात किंवा यात होणारी जिवित, वित्तहानी निश्चित पणे कमी करता येऊ शकते. त्याबाबत सर्वांनीच समन्वयाने फायर ऑडिटची कार्यवाही करुन घेणे आवश्यक आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था केवळ अग्निशमन नळकांड्यांवरच विसंबून
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानूसार येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेची दि. १० जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता अधिष्ठाता, कार्यकारी अभियंता, वैद्यकीय अधीक्षक, अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक, विद्यूत विभागाचे अभियंता, महापालिकेचे अग्निशमन अधिकारी यांनी परिसरातील जुन्या व नवीन रुग्णालयीन इमारतीची पाहणी केली. पाहणीदरम्यान अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, प्रसुती गृह, नवजात अतिदक्षता कक्ष, बालरोग शास्त्र अतिदक्षता कक्ष, औषध वैद्यशास्त्र अतिदक्षता कक्ष, शस्त्रक्रिया गृहे इतर कक्ष तसेच रुग्णालयातील व्हरांडा इत्यादीची पाहणी करुन संबंधितांस विद्यूत दुरुस्त्या, स्थापत्य निगडीत गळती, दुरुस्ती इत्यादी बाबतच्या सूचना दिल्या आहेत. महापालिका अग्निशमन अधिकार जाफर शेख यांनी सदर पाहणी केली. या पाहणीत त्यांना या संस्थेत नियमाप्रमाणे परिपूर्ण अग्निशमन सुरक्षा यंत्रणेचा अभाव दिसून आला आहे. ही संस्था केवळ अग्निशमन नळकांड्यावरच अवलंबुन आहे. नियमानूसार अग्निशमन सुरक्षा यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता असल्याचा अभिप्राय अग्निशमन अधिकारी जाफर शेख यांनी दिला आहे. या संस्थेत अग्निशमन सुरक्षा यंत्रणा उभी करण्याचा प्रस्ताव २०१९ मध्ये शासनाला पाठविलेला आहे.

लेबर कॉलनीतील स्त्री रुग्णालयातही अग्निशमन सुरक्षा यंत्रणेचा अभाव
येथील लेबर कॉलनीतील स्त्री रुग्णालयात स्त्रीयांच्या आरोग्याशी व प्रसुतीशी संबंधीत उपचार उत्तम प्रकारे उपलब्ध असल्यामुळे या रुग्णालयात येणा-या स्त्री रुग्णांची संख्या खुप मोठी आहे. या रुग्णालयात आंतररुग्ण व बा रुग्ण असे दोन विभाग चालतात. दररोजची ओपीडी लक्षणीय आहे. प्रसुतीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असतात. उपचाराने अद्ययावत असलेल्या रुग्णालयात अग्निशमन सुरक्षा यंत्रणा मात्र नसण्यातच जमा आहे. त्यामुळे भंडा-यासारखी एखादी दुर्घटना घडली तर होणारे परिणाम टाळता येणे शक्य नाही. मनपाचे अग्निशमन अधिकारी जाफर शेख यांनी या रुग्णालयात अग्निशमन सुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत करण्याबाबत अभिप्राय दिला आहे.

एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयात अग्निशमन सुरक्षा उपाय योजनाच नाही
येथील अंबाजोगाई रोडवरील एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्व. यशवंराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात अग्निशमन सुरक्षा यंत्रणा महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षण उपाय योजना अधिनियम २००६ नूसार नाही. या रुग्णालयात आंतररुग्ण व बा रुग्णांची दरारोजची संख्या खुप मोठी आहे. रुग्णालयाच्या परिसरातील तसेच लातूर, रेणापूर तालुक्यांसह इतर ठिकाणाहूनही रुग्ण मोठ्या संख्येने येतात. रुग्णालय व रुग्णालयातील सेवा सुविधा आणि यंत्रणा खुप मोठी असूनही या रुग्णालयात अग्निशमन सुरक्षा उपाय योजना नसणे एक प्रकारे रुग्णांच्या जिवाशी खेळण्यासारखेच आहे. महानगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी जाफर शेख यांनी या रुग्णालयात अग्निशमन सुरक्षा यंत्रणा किंवा तशी उपाययोजना केलेली नसल्याचे सांगीतले.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अग्निशमन सुरक्षा यंत्रणा परिपूर्ण
शहरातील गांधी चौकातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षण उपाय योजना अधिनियम २००६ नूसार अग्निशमन सुरक्षा यंत्रणा परिपुर्ण आहे, असे अग्निशमन अधिकारी जाफर शेख यांनी सांगीतले.

परिपुर्ण अग्निशमन सुरक्षा यंत्रणा कशी असते
महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षण उपाय योजना अधिनियम २००६ नूसार जी इमारत जमिनीपासून १५ मीटर उंच आहे, अशा इमारतीत होज पाईप, होज रिल, स्प्रिकलर, ऑटोमॅटीक आणि म्यानुअली अलार्म सीस्टीम, पंप हाऊस, मोटार पॅनल बोर्ड असलेले कंट्रोल रुम असले पाहिजे. इमारतीत आग कुठे लागली, इमारतीच्या कोणत्या भागातून धूर निघतोय, या सर्व गोष्टींची माहिती पॅनल बोर्डकडून मिळत असते. त्यामुळे कंट्रोल रुम महत्वपूर्ण असते, असे अग्निशमन अधिकारी जाफर शेख म्हणाले.

असंख्य शाळा, महाविद्यालयांही अग्निशमन सुरक्षा यंत्रणा नाही
शहरातील असंख्य शाळा, महाविद्यालये, मॉलमध्येही अग्निसुरक्षा यंत्रणा नाही. तशा सूचना संबंधीतांना देण्यात आलेल्या असतानाही अद्याप त्याबाबत कार्यवाही झालेली नाही, असे मनपाचे अग्निशमन अधिकारी जाफर शेख यांनी सांगीतले.

शहरातील ४५ हॉस्पिटलस्मध्ये अग्निशमन सुरक्षा यंत्रणाच नाही
लातूर शहरात सुमारे २०० पेक्षा अधिक खाजगी हॉस्पिटल्स् आहेत. त्यापैकी १६५ हॉस्पिटलस्ची महानगरपालिकेत नोंदणी आहे. या १६५ हॉस्पिटलस्पैकी केवळ ८७ हॉस्पिटलस्नी फायर ऑडिट करुन घेतलेले आहे. ३३ हॉस्पिटलस्नी नुतणीकरण करुन घेतले तर ४५ हॉस्पिटलस्मध्ये अग्निशमन सुरक्षा यंत्रणाच नाही. खरे तर सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी हॉस्पिटलस्, रुग्णालयांनी दर सहा महिन्याला आपल्या संस्थेत अग्निशमन सुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत असल्याचे बी-फार्म प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. ज्या ४५ हॉस्पिटलस्मध्ये अग्निशमन सुरक्षा यंत्रणा नाही, अशा हॉस्पिटलस्ना नोटीसा दिल्या जात असल्याचे अग्निशमन अधिकारी जाफर शेख यांनी सांगीतले.

मांडवीच्या स्टेट बँकेत शेतक-याचा आत्महत्येचा प्रयत्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या