23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरआठ लाख महिलांचा मोफत प्रवास

आठ लाख महिलांचा मोफत प्रवास

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेने देशात प्रथमच महिलांसाठी मोफत सीटी बससेवा सुरु केली. दि. १९ मार्च २०२२ पासून सुरु झालेल्या या सेवेला आता दोन महिने १६ दिवस होत आहेत. या ७२ दिवसांत ८ लाख ६४ हजार महिलांनी मोफत प्रवास केला आहे. या उपक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

महाननगरपालिकेच्या वतीने राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते महिलांसाठीच्या मोफत सीटी बससेवेचा शुभारंभ दि. १९ मार्च २०२२ रोजी करण्यात आला होता. हा उपक्रम सुरु होण्यापूर्वी बराच काथ्याकुट झाला होता. महिलांसाठी स्वतंत्र सीटी बससेवा सुरु करावी का?, फक्त ज्येष्ठ महिलांसाठीच ही सेवा उपलब्ध करुन द्यावी काय?, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनींनाच सेवा द्यावी काय? असे वेगवेगळे मत समोर आले. सर्वसाधारण सभा, परिवहन समितीच्या सभेही याच विषयावर सांगोपांग चर्चा झाली. त्यानंतर शहरातील सर्वच महिलांना, मुलींना सीटी बसमधून मोफत प्रवास देण्याचा निर्णय झाला आणि पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभही झाला.

महानगरपालिकेच्या एकुण १८ सीटी बसेसमधून दररोज साधारणत: १२ हजार महिला मोफत प्रवास करीत आहेत. त्यानूसार गेल्या ७२ दिवसांत ८ लाख ६४ हजार महिलांनी सीटी बसचा मोफत प्रवास केला आहे. शहरातील सीटी बसच्या १०७ थांब्यांवरुन महिलांना सीटी बसची मोफत प्रवासी सेवा दिली जात आहे. महानगरपालिकेच्या अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद या उपक्रमाला महिलांकडून मिळत आहे. काही दिवसांपुर्वी महानगरपालिकेचे अंदाजपत्रक सादर झाले. यात या उपकमासाठी वर्षाकाठी दोन कोटीची तरतुद करण्यात आली आहे. या उपक्रमाला महिलांचा मिळणारा प्रतिसाद पाहता महानगरपालिकेला आपले बजेट वाढवावे लागणार आहे.

पालकमंत्री अमित देशमुख यांची संकल्पना
राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या वतीने शहरातील महिलांसाठी मोफत सीटी बस प्रवास हा उपक्रम सुरु करण्यात आला आह. एखाद्या महानगरपालिकेने राबवलेला हा देशातील पहिला उपक्रम आहे. या उपक्रमाला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. शहरात फिरायला पैसा लागत नाही, असे घरोघरी महिला म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे घराजवळ मिळणारी भाजी खरेदी करायची असली तरी महिला सीटी बसने थेट गंजगोलाई गाठत आहेत. इतर खाजगी वाहनाने जाणा-या महिलाही आता सर्रास सीटी बसनेच प्रवास करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या