लातूर : प्रतिनिधी
फ्रिज ही इलेक्ट्रानिक वस्तू तशी श्रीमंतांच्याच घरी दिसून येते. परंतु, मातीचा माठ गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांच्याच घरी असतो. विशेषत: उन्हाळ्यात मातीच्या माठांना सर्वाधिक मागणी असते. गरिबांचा फ्रिज अशी ओळख असलेले मातीचे माठ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने यंदा मातीच्या माठांचे भाव १० टक्क्यांनी वधारले आहेत. असे असले तरी गरज म्हणून माठांना मागणीही वाढलेली दिसून येत आहे.
उन्हाचा तडाखा वाढत असल्याने माठाच्या खरेदीसाठी ग्राकही गर्दी करु लागले आहेत. लहान, मोठे मातीचे माठ, रांजन, सुरई, राजस्थानी लाल मातीचे माठ, तोटी असलेले माठ बाजारपेठेत उपलब्ध आहेत. शहरातील बी. एस. एन. एल. कार्यालयाच्या समोरील नांदेड रोडवर माठ विक्रीची दुकाने थाटलेली आहेत. लहान माठ २०० रुपये, मोठे माठ ३०० ते ३५० रुपये, रांजन ५०० ते ८०० रुपये, सुरई १५० ते २०० रुपये, राजस्थानी माठ २०० ते २५० रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहे. दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत असल्यामुळे थंडगार पाणी पिण्यासाठी माठ हवाच असतो. त्यामूळे माठांच्या खरेदीसाठी ग्राहाकांची गर्दी झालेली दिसून येत आहे. सध्या बाजारात आलेले काळ्या मातीचे माठ हे सारोळा रोडवरील श्रीपती कुंभार यांनी तयार केलेले आहेत. तर काही माठ ग्रामीण भागातील कुंभारांकडून बनवून घेतलेले आहेत. लाल मातीचे सर्व माठ हे राजस्थान येथून मागवून विकते जातात, अशी माहिती शामसुंदर कुंभार यांनी दिली.
तसे पाहिले तर बदलत्या काळामध्ये मातीचे माठ घडविण्याचा पारंपारी व्यवसाय करणारे लातूर शहरात खुप कमी आहेत. त्यामुळे लातूर शहरात जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून विशेषत: ग्रामीण भागातून तयार माठ आणुन येथे विक्रीस उपलब्ध करुन दिले गेले आहेत. मातीच्या माठांसाठी मोठे भांडवल गुंतवावे लागते. माती, राख, जळाऊ लाकुड महागल्याने यंदा कच्च्या मालाच्या भावात मोठी वाढ झाल्याने माठांचे दर १५ टक्क्यांनी वाढलेले आहेत. विविध कलाकुसर करण्यात आलेल्या वेगवेगळ्या आकारतील माठ ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.