लातूर : प्रतिनिधी
राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी नाविन्यपुर्ण योजनेतून जिल्ह्यात जनावरांसाठी रक्त तपासणी लॅबसाठी जिल्हा नियोजन समितीतून ४० लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तो निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे. या निधीतून लवकरच यंत्रसामग्रीची खरेदी करण्यात येणार आहे.
जनावरांना होणा-या विविध आजारांचे निदान करण्यासाठी त्यांच्या रक्त तपाणीची नितांत आवश्यकता असते. जिल्ह्यात केवळ सात ठिकाणच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयात रक्त तपासणीची सुविधा असल्याने पशुपालकांची अडचण होत आहे. त्यामुळे जनावरांवरील उपचारासाठी मर्यादा येऊ लागल्या. त्यावर मात करण्यासाठी अधिक सुविधा निर्माण करणे गरजेचे होते. त्यामुळे जिल्ह्यात अधिक रक्त तपासणी लॅब उभे करण्याचा निर्णय पाालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी घेऊन त्यासाठी नाविन्यपुर्ण योजनेतून जिल्हा नियोजन समितीतून ४० लाख ५० हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे लवकरच जिल्ह्यात नऊ ठिकाणी रक्त तपासणी लॅब निर्माण होणार आहेत.
काळानुरुप जनावरांना नवीन आजार उद्भवत आहेत. त्यांचे निदान करुन उपचारासाठी जनावरांच्या रक्ताची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. विविध आजारांच्या निदानासाठी जनावरांच्याही रक्तातील हिमोग्लोबीन, पांढ-या व तांबड्या पेशींचे प्रमाण तपासले जाते. जिल्ह्यात राज्य सरकारच्या पशु सर्वचिकित्सालयातच ही रक्त तपासणीची सुविधा आहे. जिल्ह्यात लातूर येथील जिल्हा पशु सर्वचिकित्सालय, उदगीर, औसा, अहमदपूर, निलंगा, लातूर व लातूर तालुक्यातील बाभळगाव येथे तालुका पशु सर्वचिकित्सालयातही सुविधा आहे. मात्र नव्याने झालेल्या जळकोट, शिरुर अनंतपाळ, देवणी, चाकुर व रेणापूर तालुका ठिकाणी पशु सर्वचिकित्सालयाची निर्मिती झालीच नाही. यामुळे तालुक्यातील सर्व जनावरांची अडचण होऊ लागली. तसेच सध्याच्या पशु सर्वचिकित्सालयातील रक्त तपासणी सुविधेचा लाभ घेण्यासाठी अनेक गावांना २५ ते ४० किलोमीटर एवढे अंतर कापून यावे लागत होते.
पुश पालकांची ही अडचण लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातच ही सुविधा करण्याची संकल्पना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी मांडली. मात्र, त्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यांकडे निधी उपलब्ध नव्हता. पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी नाविन्यपुर्ण योजनेतूनया उपक्रमाला निधी देण्याची तयारी दाखवल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने प्रस्ताव दिला. त्यानंतर पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीतून ४० लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला. तो निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे. या निधीतून लवकरच यंत्रसामग्रीची खरेदी करण्यात येणार आहे.