लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहरात घरगुती वापरासाठी पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरु असून एम.आय.डी.सी.मधील उद्योगजकांनादेखील गॅसरुपी इंधन पुरवठा करण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने सुरु असलेल्या मोहीमेला सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांनी दिले.
अशोका गॅस कंपनीकडून लातूर जिल्ह्यातील चिंचोली काजळी या ठिकाणी सी.एन.जी.प्रकल्प सुरू करण्यात आला असून या प्रकल्पास राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांनी शनिवार दिनांक १६ जानेवारी रोजी दुपारी सदिच्छा भेट देऊन या ठिकाणी उभारण्यात आलेल्या दबाव नियंत्रण युनिट, कॉप्रेसर युनिट, फिलिंग युनिटची पाहणी केली. यानंतर त्यांच्या हस्ते प्रकल्प स्थळावर वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
अशोका गॅस या नावीन्यपूर्ण प्रकल्पाची सुरुवात लातूर जिल्ह्यात झाली आहे असे सांगुन यावेळी बोलताना पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर मधून गॅस पाईपलाइन जाणार अशी चर्चा फार पूर्वी ऐकली होती जी आज लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातून गॅस पाईप लाईन गेल्याचे व त्यावर आधारित सी.एन.जी प्रकल्प उभा राहिलेले आपण पाहतोक आहोत. हे जिल्ह्याच्या दृष्टीने क्रांतीकारक पाऊल असून येणाऱ्या काही दिवसात लातूर शहर मनपा क्षेत्रात प्रत्येक घरापर्यंत पाइपलाइन द्वारे गॅस पुरवठा करण्याचे उद्दिष्ट साध्य केले जाईल. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रासाठी देखील पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असा विश्वास व्यक्त करीत ना.अमित विलासराव देशमुख यांनी अशोका समूह प्रकल्प व्यवस्थापकांना या प्रकल्प उभारणीबद्दल शुभेच्छा दिल्या.
या प्रकल्पाची माहिती देताना प्रकल्प प्रमुख अमित कुमार स्याम म्हणाले की, सदर प्रकल्प हा मराठवाड्यातील पहिला प्रकल्प असून अशोका समूहाला भारतात २५० पंप सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. मात्र सर्वात लवकर लातूरसाठी प्रशासनाकडून ना-हरकत मिळाली आणि यासाठी ना.अमित विलासराव देशमुख यांचे सहकार्य मिळाले. यासोबतच लातूर शहरातील जुनी व नवीन एम.आय.डी.सी. सोबत रेल्वे कोच फॅक्ट्रीसाठी देखील सी.एन.जी. प्रकल्प सुरू केला जाणार असून यासाठी पाईप लाईन टाकण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
सी.एन.जी. गॅस प्रकल्पाच्या माध्यमातून लातूरमध्ये वाहन धारकांना सेवा मिळणार असून या माध्यमातून एक नवी सुरुवात होत असल्याचे म्हणत लातूर मनपासोबत वातावरणातील प्रदूषण आणि सी.एन.जी. याचे महत्त्व लातूरवासियांना समजावुन याकामात पुढाकार घेण्यास सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करीत अशोका समूहाच्या या प्रकल्पास महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रकल्प प्रमुख अमितकुमार स्याम, महापौर विक्रांत गोजमगुंडे, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाट, मारुती महाराज कारखान्याचे उपाध्यक्ष श्याम भोसले, समद पटेल, बाबासाहेब गायकवाड, प्रकल्प समन्वयक शैलेश नकाते, रोहित वाघ, सिद्धार्थ शर्मा, धनंजय देशमुख, स्वप्नील गुरव, रोहित बाहेती, सचिन जाधव, संतोष हल्लाळे, राजेंद्र मोरे यांच्यासह अशोका समूहाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अफवांना बळी पडू नका दोन्हीही लसी सुरक्षित – पंतप्रधान नरेंद्र मोदी