22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeलातूरखाजगी रुग्णालय परिसरात शासनमान्य दराचे फलक

खाजगी रुग्णालय परिसरात शासनमान्य दराचे फलक

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोनावर उपचार करणा-या सर्व खासगी रुग्णालयांच्या परिसरात महानगरपालिकेच्या वतीने शासनमान्य दर दर्शवणारे फलक लावण्यात आले आहेत. यामुळे रुग्ण व नातेवाईकांना संबंधित रुग्णालयाने आपल्यावर केलेल्या उपचारांचा खर्च तपासून पाहता येणार आहे. तो अधिक आहे, असे वाटले तर त्यासंबंधी विचारणाही करता येणार असून पालिकेच्या हेल्पलाईनवर तक्रार करता येणार आहे.

लातूर शहरात ५५ पेक्षा अधिक खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. उत्तम पद्धतीचे, अद्ययावत उपचार संबंधित रुग्णालयांकडून उपलब्ध करुन दिले जात आहेत.आजपर्यंत हजारो रुग्ण हे उपचार घेऊन बरे झाले आहेत. खाजगी रुग्णालयात उपचार घेताना अनेकवेळा संबंधित डॉक्टर योग्य पद्धतीने बिल घेत आहे की नाही ? अशी शंका असते. क्वचित प्रसंगी एखाद्या रुग्णालयात अधिक पैसे घेतले जात
असल्याची नातेवाईकांची तक्रार असते. अशावेळी डॉक्टरांनी आपल्याला दिलेले बिल तपासून पाहता यावे यासाठी महानगरपालिकेच्या वतीने सर्व खासगी रुग्णालयांच्या परिसरात शासनमान्य दर दर्शविणारे फलक लावण्यात आले आहेत.यामुळे डॉक्टरांनी अधिकचे बिल लावलेले आहे की नाही? हे तपासून घेता येणार आहे.

शासकीय दरानुसार एखादा रुग्ण जनरल वॉर्डमध्ये विलगीकरणात असेल तर त्यासाठी ४ हजार रुपये दर आहे. व्हेंटिलेटर शिवाय रुग्ण अतिदक्षता विभागात विलगीकरणात असेल तर त्यासाठी ७ हजार ५००रुपये तर व्हेंटिलेटरसह उपचार सुरु असतील तर त्यासाठी ९ हजार रुपये शासकीय दर निश्चित करण्यात आलेला आहे. एक दिवसाच्या आकारण्यात आलेल्या दरामध्ये रुग्णाची नियमित देखभाल, रक्त व लघवी तपासणी, २ डी इको, एक्स-रे, ईसीजी व ऑक्सिजन चार्ज, मर्यादित किरकोळ औषधे, डॉक्टर तपासणी, बेड चार्जेस, जेवण, नाकातून नळी टाकण्यासारखे छोटे उपचार यांचा समावेश आहे.

याशिवाय पीपीई किट, सेंट्रल लाईन टाकणे, केमोपोर्ट टाकणे, श्वसन नलिका व अन्य नलिकात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,कुठल्याही अवयवाचा तुकडा तपासणीसाठी पाठवणे, छातीतील व पोटातील पाणी काढणे, सिटीस्कॅन सारख्या तपासण्या यासाठी स्वतंत्र दर आकारण्यात येतो. एक दिवसाच्या शुल्कामध्ये या तपासण्यांच्या शुल्काचा समावेश असत नाही. त्यासाठी स्वतंत्रपणे पैसे द्यावे लागतात.

अभिजीत पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी; पंढरीत स्वखर्चाने पाटील यांनी उभारले थिएटरमध्येच कोविड हॉस्पिटल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या