25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरपदवीधारकांनी आता समाजाला देण्यासाठी पुढे यावे

पदवीधारकांनी आता समाजाला देण्यासाठी पुढे यावे

एकमत ऑनलाईन

लातूर : पदवीधरांनी २१ व पदव्युत्तरांनी वयाची २३ वर्षे शिक्षण सुरू असताना समाजाकडून घेण्याचे काम केले. आता पदवीधर झाला आहात. तुम्ही समाजाला देण्याची वेळ आली आहे. यासाठी हात आखडता घेऊ नका, असे आवाहन नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. डी. एम. नेटके यांनी केले.
येथील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेल्या २३८ विद्यार्थ्यांना पदवी वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा यांची उपस्थिती होती. यावेळी कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपप्राचार्य डी. आर. सोमवंशी, ट्रेनिंग व प्लेसमेंट प्रमुख प्रा. कैलास जाधव, डॉ. डी. एच. महामुनी, प्रा. गणेश पवार उपस्थित होते.

यावेळी डॉ. नेटके म्हणाले, २०१६ पर्यंत पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विद्यापीठातच पदवी प्रदान करण्यात येत होती. यात सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होता येत नव्हते. यामुळे महाविद्यालयस्तरावरच पदवी वितरण करण्याच्या सूचना आल्याने असे कार्यक्रम आता महाविद्यालयातच होत आहेत. यात सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेता येत आहे. पदवी पूर्ण होण्यास २१ व पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण होण्यास २३ वर्षांचा कालावधी जातो. या वयापर्यंत तुम्हाला आई – वडील, समाज सर्व काही देण्याचा प्रयत्न करतात. पदवी पूर्ण झाल्याने तुम्ही पूर्णपणे समाजात देण्यायोग्य व्यक्ती बनलेल्या आहात. आता समाजाला तुम्ही देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ज्ञान, पैसा, संस्कार देण्यात कसलीही कुचराई करू नका, समाजाला सढळ हाताने मदत करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी डॉ. बी. एस. नागोबा यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पदवी प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला समाजात वावरण्यासाठी मिळालेला पासपोर्ट आहे. याच्या माध्यमातून तुम्ही आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घेण्यास सज्ज झाला आहात. तुम्ही ज्या क्षेत्रात जाल, त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी स्वत: चे समाधान होईपर्यंत करीत राहिलात तर त्या कामात नक्कीच यश आहे, असा विश्­वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी महाविद्यालयातील २३८ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश पवार यांनी केले.

अध्यक्षीय समारोपात संस्थाध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील म्हणाले, पदवी प्राप्त करणे ही महत्वपूर्ण बाब आहे. पदवीशिवाय जगातील एकही नोकरी मिळत नाही. कौस्तुभ दिवेगावकर यांनी घरी बसून तर जी. श्रीकांत यांनी रेल्वे सेवेत राहून अभ्यास केला. ते आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाले, असे सांगून ते म्हणाले, महाभयंकर कोरोना महामारी येवूनही विभागीय परीक्षा मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलू दिले नाही. ते अविरतपणे सुरळीत सुरू ठेवले. परंतु, विद्यापीठाचा परीक्षा विभाग अद्यापही कोरोनाने सावरल्याचे दिसत नाही. अनेक पदवी, पदव्युत्तर परीक्षांचे निकाल जाहीर झाले नाहीत, यामुळे पुढील वर्गाचे प्रवेश रखडले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने सुरळीतता आणून प्रवेश वेळेत व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या