लातूर : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने व स्वातंत्र्य लढ्यातील महात्म्यांचे स्फुर्ती कायम स्मरणात राहावी, या उद्देशाने शासन आदेशानूसार जिल्ह्यात १३ ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस ‘हर घर झेंडा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात पाच लाख घरांवर तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालये, संस्थांच्या कार्यालयावर तिरंगा ध्वज नियमानूसार फडकविण्यात येणार आहे. या उक्रमाची जनजागृती करण्यासाठी व कोरोना बूस्टर डोस घेण्यासंबंधी माहिती देण्यासाठी येत्या २५ ते २९ जुलै या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्रामसभा घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयला यांनी दिली.
‘हर घर झेंडा’उपक्रमाबाबत माध्यम प्रतिनिधींसह सामाजिक संस्था, संघटना, व्यापारी, शिक्षण, वैद्यकीय, अशा विविध क्षेत्रातील पदाधिका-यांशी चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित बैठकीत अभिनव गोयल बोलत होते. यावेही अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंंडे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांची उपस्थिती होती. प्रारंभी किशोर काळे यांनी ‘हर घर झेंडा’ उपक्रमाची माहिती व रुपरेषा सांगीतली. तीन दिवस चालणा-या या उक्रमात तिरंगा ध्वज सूर्याेदयानंतर बाबुला अथवा काठीवर घरावर किंवा दरवाजात, खिडकीला फडकवावा व सूर्यास्तानंतर ध्वज खाली उतरवावा. ध्वज फडकवताना अवमान होणार नसल्याची दक्षता घ्यावी., असे सांगीतले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल म्हणाले की, जिल्ह्यात पाच लाख घरांवर तसेच सर्व शासकीय, निमशासकी, सामाजिक संस्था, दवाखाने, शाळा, महाविद्यालयांवर ध्वज फडकावण्यात येणार आहे. ध्वज उपलब्ध करुन देण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फुर्तपणे सहकार्य करावे. ध्वज ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यालयात विक्री केंद्रावर पुरवठा केले जातील. तेथून ते घ्यावेत. तसेच शहरी भागात नगरपालिका व महानगरपालिकेने त्यांच्या कार्यालयात किंवा जास्तीत जास्त वितरण केंद्र उघडावेत. ध्वजाची किंमत जास्तीत जास्त ३० रुपये असेल. वितरण केंद्रावर ध्वज फडकविण्याची नियमावली असेल. अतिरिक्त जिल्हाधिकारी लोखंडे यांनी या उपक्रमाची जनजागृती सर्व स्तरावर व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत तिरंगा ध्वज ज्यांना देता येईल त्यांनी द्यावा, ज्यांना विकत घेता येईल त्यांनी घ्यावा आणि घरावर फडकवावा, असे आवाहन केले. या बैठकीचे आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांनी मानले.