औसा : मतदारसंघातील हासुरी, सांगवी, उस्तुरी, हिप्परसोगा, सारोळा आदी गावांतील सोयाबीन व इतर खरिप पिकांची आमदार अभिमन्यू पवार यांनी पाहणी केली. सोयाबीन पिकांवर चक्रीभुंगा, खोडअळी व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने याबाबत तातडीने औशात आढावा बैठक घेवून सोयाबीन नुकसानीचे वैयक्तीक पंचनामे करून नैसर्गिक आपत्ती अंतर्गत तसेच पिकविमा नुकसानीच्या नियमानुसार २५ टक्के आगाऊ देणेबाबत जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्याकडे आमदार पवार यांनी एका पत्राद्वारे मागणी केली.
सोयाबीन वाढ होऊनही शेंगा कमी लागल्या तसेच अनेक शेतक-यांच्या सोयाबीनला शेंगा लागल्या असताना पावसाच्या खंडामुळे शेंगा भरल्या नाही. त्यामुळे उत्पन्नात ५० टक्के पेक्षा अधिक घट दिसून येत आहे.जवळपास सर्वच शेतक-यांनी सोयाबीनचा प्रधानमंत्री कृषी पीकविमा योजना खरिप २०२० -२१ अंतर्गत पिकविमा हप्ता भरला असून विमा शासन आदेशानुसार अपेक्षित उत्पन्नात पन्नास टक्के पेक्षा जास्तीची घट दिसून येत असल्यास हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे या या तरतुदीनुसार सोयाबीन या अधिसुचीत पिकासाठी संभाव्य पिकनिहाय नुकसान भरपाई नुकसानीच्या २५ टक्के आगाऊ रक्कम देणेबाबत जोखीम तरतूद आहे.
तसेच नैसर्गिक आपत्ती अंतर्गत किड रोग, पावसातील खंड यामुळे शेतक-यांच्या पिकांची ३३ टक्के रक्कमपेक्षा जास्त नुकसान झाल्यास पंचनामे करून मदत देण्याची तरतूद केंद्राच्या आपत्ती व्यवस्थापन आदेशात समाविष्ट आहे. या दोन्ही आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत सोयाबीन नुकसानग्रस्त शेतक-यांना पीकविमाच्या आगाऊ रक्कम मंजूर करण्याबाबत तसेच नैसर्गिक आपत्ती नुसार भरपाई देण्याची मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी जिल्हाधिका-यांकडे एका पत्राद्वारे केली आहे
अन्यथा शेतक-यांना घेऊन आंदोलन करणार
शेतक-यांंना या मागणीनुसार नुकसान भरपाई नाही मिळाल्यास शेतक-यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी आमदार पवार यांनी दिला. जिल्हाधिकारी हे जिल्हा स्तरीय संयुक्त समितीचे अध्यक्ष असल्याने सदरील नुकसानीचे अधिसूचना काढण्याचे अधिकार शासन आदेशानुसार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक घट उत्पन्नात झाल्यास पंचवीस टक्के आगाऊ रक्कम देण्याचे अधिकार त्यांना असल्याने व जिल्हाधिकारी हे अत्यंत कर्तव्यदक्ष असल्याने ते आंदोलन करण्याची वेळ निश्चित येवू देणार नसल्याचेही आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
कोरोनाचा महाविक्रम : ४४३ पॉझिटीव्ह