लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील सात बसस्थानकांची बांधकामे त्वरीत पूर्ण करावीत, बांधकामाचा दर्जा राखावा त्याच बरोबर लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बसडेपोचा परिसर विकसित करण्याबाबत प्रस्ताव तातडीने सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सोमवार दि. १७ ऑगस्ट रोजी आढावा बैठकी दरम्यान दिले आहेत.
पालकमंत्री देशमुख यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर जिल्ह्यातील अधिका-यांसमवेत सोमवारी येथील विश्रामगृहावर आढावा बैठक घेतली. बैठकी दरम्यान प्रारंभी सदयाची बसवाहतुक व्यवस्था, लातूर जिल्ह्यात बसस्थानकाची कामे परीवहन महामंडळाच्या अडचणी याबाबत त्यांनी माहीती करुन घेतली. जिल्ह्यात सदया एकुण सात बसस्थानकाची बांधकामे सुरु आहेत यापैकी शिरूर अनंतपाळ बसस्थानकाचे काम पूर्ण झाले असून उदगीर आणि कासारशीरशी बसस्थानकाची कामे सुरु होत आहेत.
निलंगा, लामजना, औसा, देवणी या चार बसस्थानकाची कामे प्रगतीपथावर आहेत. या बांधकामाचा दर्जा राखला जावा अशी सुचना पालकमंत्री देशमुख यांनी केली. लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बसडेपोचे परीसराचा विकास करण्यासाठी यापूर्वी प्रस्ताव दाखल झाला होता. हा प्रस्ताव नव्याने तयार करून सादर करावा अशी सुचना त्यांनी केली.
लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर जिल्ह्यातील पाच डेपोमधून प्रत्येकी दहा बसगाड्या जिल्हातर्गत सुरु करण्यात आल्या आहेत. प्रवाश्यांचा प्रतिसाद लक्षात घेता या बसगाड्या वाढवण्यात याव्यात, असे निदे्रश पालकमंत्री देशमुख यांनी दिले. या बैठकीस लातूर विभाग नियंत्रक सचिन क्षिरसागर, औरंगाबाद विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश राजगीरे, विभागीस स्थापत्य अभियंता जगदीश कोकाटे आदी उपस्थित होते.
महेंद्रसिंग धोनी ; भारतीय क्रिकेटला पडलेले गोड स्वप्न