लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात उद्या दि. ९ फेब्रुवारीपासून ‘जागरुक पालक, सदृढ बालक’ अभियान राबिण्यात येणार आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील एकूण ६ लाख ७४ हजार ६३७ बालके, किशोरवयीन मुला-मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे यांच्यासह सर्व संबंधित विभागप्रमुख तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते. शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील बालकांची, किशोरवयीन मुला-मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे, आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे, गरजू आजारी बालकांना संदर्भसेवा देवून उपचार करणे, प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे, सुरक्षित व सदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे हा ‘जागरूक पालक, सदृढ बालक’ अभियानाचा उद्देश आहे.
या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, आश्रमशाळा, अंगणवाड्या, बालगृहे, बालसुधारगृहे, अनाथालये, समाज कल्याण व आदिवासी विभागाची मुला-मुलींची वसतिगृहे, खाजगी नर्सरी, बालवाड्या, खाजगी शाळा व खाजगी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील शाळाबा मुला-मुलींची तपासणी करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील एकूण ६ लाख ७४ हजार ६३७ मुले-मुली असून हे अभियान ९ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात राबविले जाणार आहे.