21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूरसंततधार पावसाने एसटीच्या पंढरपूर यात्रेवर फेरले पाणी !

संततधार पावसाने एसटीच्या पंढरपूर यात्रेवर फेरले पाणी !

एकमत ऑनलाईन

लातूर : पंढरपूर यात्रेसाठी लातूर जिल्ह्यातून दरवर्षी मोठया प्रमाणात भाविक भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. आषाढी वारी करणा-या भाविक-भक्तांची सोय व्हावी, म्हणून एसटी महामंडळाच्या लातूर विभागीय कार्यालयाने ११५ जादा बसेसचे नियोजन केले होते. मात्र आषाढी यात्रा कालावधीत पडलेल्या संततधार पावसाने एसटी महामंडळाच्या लातूर विभागाला अपेक्षीत उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न मिळाले. यात्रा कालावधीत लातूर विभागाला ५८ लाख ९ हजार ९१९ रूपयांचे उत्पन्न मिळाले.

पंढरपूर आषाढीवारी आली की, विठ्ठलभक्तांना वेध लागतात ते विठुरायाच्या भेटीचे. त्यामुळे राज्यभरातील भाविकांसह लातुरातील भाविकभक्तही विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला चालत, वाहनाने, रेल्वेने जातात. कोरोना विषाणूमुळे गेल्या दोन वर्षात पंढरपूर यात्रा झाली नसल्याने अनेक भाविकांना विठूरायाच्या दर्शन घेण्याचा योग आला. या भाविकांची सोय व्हावी, म्हणून एसटी महामंडळाच्या लातूर विभागीय कार्यालयाने ११५ जादा बसेसचे नियोजन केले होते. यात लातूर आगारातून ४०, निलंगा आगारातून १६, उदगीर आगारातून २५, औसा आगारातून १७, तर अहमदपूर आगारातून १७ बस दि. ६ ते १३ जुलै या दरम्यान धावल्या.

या यात्रेचे मुख्य दिवस दि. १० जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी व दि. १३ जुलै रोजी गुरू पौर्णिमा असे होते. या पंढरपूर यात्रा कालावधीत १ कोटी ६८ लाख ७ हजार ५०० रूपयांचे उत्पन्न मिळेल, असे नियोजन लातूर विभागीय कार्यालयाने केले होते. मात्र यात्रा कालावधीत झालेला संततधार पाऊस, तसेच पंढरपूर येथे झालेली वाहतूक कोंडी यामुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला. तसेच या कालावधीत रेल्वे विभागाने लातूर येथून प्रवाशांना पंढरपूरला जाण्यासाठी रेल्वे सेवा उपलब्ध करून दिल्याने त्याचाही फटका एसटी महामंडळाला बसला. पाच आगारातील ११५ बसेसनी यात्रा कालावधीत १ लाख ६७ हजार ५५० किलोमिटर अंतर धावत ५८ लाख ९ हजार ८१९ रूपयांचे उत्पन्न मिळवले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या