शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुलगा, बाकली, बिबराळ, उजेड व परीसरातील गावांमध्ये गुरूवारी सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसाने शेतजमीन खरडून वाहून गेली आहे. यात कोवळ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तर नाल्यांना पूर आल्याने नाल्याकाठच्या शेतक-यांना चांगलाचा फटका बसला आहे. या मुसळधार पावसाने शेतक-यांवर अस्मानी संकट कोसळले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
या सर्वदूर बरसलेल्या या मुसळधार पावसामुळे शिवारातील नाल्यांना पूर आल्याने वाहनधारकांना ताटकळत बसावे लागले.तर काहींच्या शेतात पावसाचे पाणी साठले असून काहींची शेती पिकांसह खरडून गेली आहे.त्यामुळे महसूल व कृषी विभागाने तातडीने या नुकसानग्रस्त शेताची पाहणी करून संबंधित शासनाकडून योग्य नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.दरम्यान तालुक्यात पेरणी योग्य पाऊस झाल्याने पेरणीला चांगलाच वेग आला आहे. तर काही शिवारात कोवळी पिके उगवली आहेत. गेल्या रविवारी पाऊस झोडपल्याने काहींना दुबार पेरणी करावी लागली होती.त्यात गुरुवारी पुन्हा मुसळधार पावसाने शेतक-यांवर संकट ओढावले असून या पावसाने शेतजमीन खरडून गेली, पिकांसह
जमीन वाहून गेल्याने शेतकरी हताश झाले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून शेतकरी सतत संकटांचा सामना करीत अडचणीत जीवन जगत आहे. पूर परिस्थिती, दुबार पेरणीचे संकट सहन करीत यंदा अडचणीतून शेतकरी उभा राहत खरीप पेरणीची जुळवाजुळव केली मात्र गुरुवारच्या मुसळधार पावसाने शेतक-याच्या स्वप्नावर विरजन पडले आहे. प्रशासनाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नुकसानगृस्त शेतक-यांतून केली जात आहे.