निलंगा : लक्ष्मण पाटील
तालुक्यातील औरादासह परिसरातील गावात दि ३० जुलै रोजी सायंकाळी झालेल्या मुसळधार अतिवृष्टीचा परिसरातील शिवारातील अनेक गावांना तडाखा बसला असून शेकडो हेक्टरवरील पेरणी केलेले खरिपाची पीक पूर्णत: पाण्याखाली गेली आहते. शेतीला नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले असून नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. विशेषत: शेतक-यांचे मुख्य पीक सोयाबीन पूर्णत: पाण्याखाली गेले आहे तर औराद शहाजानी येथे एक तासात ६० मिलिमीटर पाऊस झाला आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतक-यांतून होत आहे.
निलंगा तालुक्यात जून महिन्यात हुलकावणी दिलेल्या पावसाने जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील अनेक मध्यम प्रकल्प व साठवण तलाव पूर्णत: भरले असून अनेक मंडळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असल्याची नोंद झाली आहे.अगोदरच रानडुक्कर, हरीण, गोगलगाय, अशा कितीतरी संकटाना सामोरे जाता दमछाक झालेल्या बळीराजाला हा अतिवृष्टीच्या तडाखा न सहन होण्यापलीकडचा असून उसनवारी करून हजारो रुपये खर्च केलेला पैसा कसा चुकता करावा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे .
दि ३० जुलै रोजी सायंकाळी निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, सावरी, माकणी, चांदोरी ,चांदोरीवाडी, कोयाजीवाडी, तगरखेडा, बोरसुरी, हलगरा आदीसह गावात अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने खरिपाची पिकेअक्षरश: खरडून गेली आहेत. शिवाय सोयाबीन पूर्णत: पाण्यात असल्याने शेतक-यांवर अस्मानी संकट कोसळले आहे म्हणून देशाचा अन्नदाता बळीराजा मोठ्या अडचणीत सापडला आहे. यामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतक-यांतून होत आहे.
दरम्यान औराद शहाजानी येथे एक तासात ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे येथील हवामान केंद्रात नोंद झाली असल्याचे मुक्रम नाईकवाडे यांनी सांगितले. तर चांदोरी येथे अतिवृष्टीमुळे भानुदास सोळुंके, वसंत सोळुंके, गुणवंत पाटील, पांडुरंग सोळुंके, गोंिव्ांद सोळुंके, गोरोबा माकणे, बबन सोळुंके, व्यंकट माकणे, अजित शिरसे, दीपक सोळुंके आदीसह अनेक शेतक-यांच्या शेकडो हेक्टरवरील पिकासह माती वाहून गेली आहे शिवाय चांदोरी तेचिंचोली (सा.) मधील ओढ्यावर पाणी असल्याने वाहतूक बंद होती.