29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeलातूरशेकडो मृत देहांवर मनपाकडून अन्त्यसंस्कार

शेकडो मृत देहांवर मनपाकडून अन्त्यसंस्कार

एकमत ऑनलाईन

लातूर : जो व्यक्ती आयुष्यभर आपल्या सोबत राहिला त्याच्या मृत्यूनंतर केला जाणारा अंत्यसंस्कार हा अतिशय दु:खद व तेवढाच भावनिक प्रसंग. आपल्या मातापित्यांचा अथवा जवळच्या नातलगांचा अंत्यविधी स्वत:च्या हाताने करता यावा ही प्रत्येकाचीच सहाजिक इच्छा.पण कोरोनाने या भावनेलाच तडा दिलाय. त्यामुळे आई- वडिलांच्या पार्थिवावर देखील पुत्राला अंत्यसंस्कार करता येत नाहीत. अशा स्थितीत लातूर महानगरपालिका पुत्राच्या कर्तव्य भावनेतून अशा बाधित व्यक्तींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करत आहे. वर्षभरात अशा शेकडो मृतदेहांवर पालिकेने अंत्यसंस्कार केलेत.गेल्या काही दिवसांत तर बाधितांची संख्या आणि मृत्यूचा आकडा वेगाने वाढतोय. अशा स्थितीत स्मशानभूमीत चिता अखंड धगधगत असल्याचे पहायला मिळत आहे.

कोरोनाने नातीगोती संपवलीत. या महामारीमुळे जवळचे नातेवाईक दूर गेले. घरातील व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्यानंतर तो लवकरात लवकर
सुदृढ व्हावा यासाठी धावाधाव करणारे कुटुंबीय एकीकडे तर जिवलगाच्या मृत्यूनंतर स्मशानभूमी पर्यंतही न येणारे नातलग अशी स्थिती दुस-या बाजूला दिसून येते.त्यातच कोरोना संदर्भातील शासनाचे निर्बंधही असतात.याचा आधार घेत जिवंतपणीच जन्मदात्यांना सोडून देणारेही या काळात दिसून आलेत.

शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी बाधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांना सोपवण्यात आली. लातूर महानगरपालिकेने वर्षभरापासून ही जबाबदारी नेटाने पार पाडली आहे. शेकडो मृतदेहांवर पालिकेच्या कर्मचा-यांनी अंत्यसंस्कार केले असून मृत व्यक्तीच्या जाती-धर्मानुसार योग्य त्या पद्धतीने हा विधी पार पाडला जात आहे.

पालिकेच्या वतीने खाडगाव स्मशानभूमी, मारवाडी स्मशानभूमी तसेच सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस असणा-या स्मशानभूमीत हे अंत्यविधी पार पाडले जात आहेत. मनपाची कर्तव्य भावना… शासनाच्या कोरोना संदर्भातील निर्देशानुसार कोरोना बाधिताच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी महानगरपालिकेवर आहे. परंतु केवळ शासनाचे निर्देश आहेत या भावनेतून पालिकेचे कर्मचारी अंत्यविधी करत नाहीत तर कर्तव्य भावनेतून त्यांनी आजवर आपली जबाबदारी पार पाडली आहे. ऊन,वारा, पाऊस,दिवस-रात्र याची कसलीही तमा न बाळगता हे कर्मचारी अखंडपणे अंत्यसंस्काराचे कर्तव्य बजावीत आहेत.स्वत:चा जीव धोक्यात घालून,कुटुंबियांपासून दूर राहत या कर्मचा-यांनी आजवर हे कार्य केले आहे.

त्या- त्या धर्माच्या पद्धतीप्रमाणे अन्त्यविधी
मृत व्यक्तीच्या धर्मानुसार त्याच्या पार्थिवावर पालिकेकडून अंत्यसंस्कार केले जातात.ज्या समाजात दहनविधी केला जातो त्यांच्यावर मारवाडी स्मशानभूमीकिंवा खाडगाव स्मशानभूमीत अंत्यविधी होतो तर सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागील स्मशानभूमीत दफनविधी केले जातात. अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकूड व इतर साहित्यही पालिकेच्या वतीने आणले जाते.यासाठी प्रत्येकी चार हजार रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

अन्त्यसंस्कारांसाठी कर्मचा-यांची नियुक्ती
कोरोना बाधितांच्या मृत्यूची संख्या वाढत असताना त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने ८ कर्मचा-यांरी त्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये पथक प्रमुख म्हणून स्वच्छता निरिक्षक सिद्धाजी मोरे, सहाय्यक सुरेश कांबळे, कर्मचारी गौतम गायकवाड, सचिन बनसोडे, मुकिेंद सरवदे, भीमा टेंकाळे, विलास सुरवसे, वाहनचालक राजेंद्र सोट यांचा समावेश आहे.

जळकोट तालुक्यातील लसीकरणाला ब्रेक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या