लातूर : प्रतिनिधी
मागील काही दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमांतून धार्मिक आणि जातीय भावना दुखावून दोन समाजांत तेढ निर्माण होतील असं स्टेटस, व्हिडिओ क्लिप्स,आक्षेपार्ह मजकूर, एसएमएस तयार करुन प्रसारित करणा-या विरोधात पोलीस अधीक्षक कार्यालयाने कारवाई सुरु केली. यासाठी पोलिसांनी ‘लातूर सोशल मीडिया वॉचर्स’ ही व्यवस्था अधिक प्रभावीपणे सुरु केली आहे. त्यामुळे आक्षेपार्ह पोस्ट केली तर थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी नागरिकांना सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळण्याचं आवाहन केलं होतं. सोशल मीडियाच्या माध्यमांतून पसरवण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टची सर्वप्रथम खात्री करणं अत्यावश्यक आहे. पोलीस सर्व परिस्थितीला हाताळण्यास सक्षम असून, सायबर पोलीस टीम तंत्रज्ञान आणि लातूर सोशल मीडिया वाचर्स टीमच्या साहाय्याने सर्व सोशल मीडिया साइटवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या सोशल मिडिया पेट्रोलिंगमुळे सातत्याने थेट आणि धडक गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. या कारवाई नुसार मागील चार दिवसाच्या कालावधीत लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणांमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणा-या कोणत्याही व्यक्तीची हयगय न करता, त्यांच्याविरुद्ध सक्त कारवाई करण्यात येत आहे. सामाजिक शांतता खराब करून अशांतता होईल, असं वातावरण निर्माण करणा-या व्यक्तींविरोधात विविध कलम व कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. आक्षेपार्य पोस्ट करणा-या काही अल्पवयीन मुलांनासुद्धा पालकासह पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन त्यांनी केलेली पोस्ट डिलीट करण्यात आलेली असून त्यांना समज देण्यात आलेली आहे.